राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू असून प्रचारासाठी केवळ एक आठवड्याचा कालावधी शिल्लक राहिला असल्याने उमेदवार व नेत्यांचा प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी आटापिटा सुरू आहे. महायुती व महाआघाडीच्या नेत्यांकडून एकमेकांवर सडकून टीका होताना दिसत आहे. राज्यातील प्रमुख नेत्याच्या राज्यभर सभा होत आहेत. उद्धव ठाकरे यांच्या बॅगांची दोन वेळा तपासणी झाल्यानंतर राज्यात मोठा गदारोळ झाला होता. आता अन्य राजकीय नेत्यांच्या बॅगांचीही तपासणी केली जात आहे. आज उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची बारामती येथे हेलिकॉप्टर आणि बॅगची तपासणी करण्यात आली.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नेते व माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या बँगांची सोमवारी आणि मंगळवारी तपासणी झाल्याच्या मुद्द्यावरून महाआघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उठवली असताना आता उपमुख्यमंत्री तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांच्या हेलिकॉप्टरचीही निवडणूक आयोगाकडून तपासणी केली आहे. यासंदर्भातील माहिती स्वत: अजित पवार यांनी दिली आहे. अजित पवारांनी सोशल मीडिया अकाऊंटवरुन ही माहिती दिली आहे. विशेष म्हणजे अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधील बॅगेत सापडलेल्या गोष्टींने अनेकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. एकीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बँगांचीही५नोव्हेंबर रोजी तपासणी झाल्याचे व्हिडीओ भाजपाने पोस्ट केले असतानाच आता अजित पवारांच्या बँगांचीही तपासणी झाल्याचं समोर आलं आहे.
बारामतीत अजित पवारांच्या हॅलिकॅाफ्टरची तपासणी करण्यात आली. अधिकाऱ्यांनी अजित पवारांच्या सर्व बॅगा तपासल्या. त्यावेळी अजित पवारांनी फोनवर बोलत असताना स्वतः बॅगा तपासण्यासाठी दिल्या. यावेळी एका बॅगेत चकल्या होत्या. बॅगेत चकल्या हातात घेऊन खा-खा बाबा...सगळ्या बॅगा तपास. हा डबा तपास, त्या डब्यात पैसे आहेत का चेक कर...असं अजित पवार अधिकाऱ्यांना बोलताना ऐकू येत आहे.
अजित पवारांनी आपल्या एक्स हॅण्डलवरुन निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी हेलिकॉप्टर आणि त्यामधील बँगांची तपासणी केल्याचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ हेलिकॉप्टरमधून शूट करण्यात आला आहे. हेलिकॉप्टर बाहेर उभे असलेले अधिकारी सीटवर ठेवलेली अजित पवारांची बॅग तपासताना दिसत आहेत. अधिकारी बॅगमधील सामान तपासत असताना अजित पवार मोबाईलवर बोलताना दिसत आहेत. एका हातात मोबाईल आणि दुसऱ्या हाताने बॅग उघडून देत कर्मचाऱ्यांना बॅगमध्ये काय आहे हे दाखवत असल्याचं दिसत आहे. अजित पवारांनी आपल्याकडील लॅपटॉप बॅगही अधिकाऱ्यांना तपासण्यासाठी दिली. तसेच त्यानंतर त्यांनी थंड पाण्याच्या बाटल्या ठेवण्यासाठीचा बॉक्सही अधिकाऱ्यांना उघडून दाखवला.
हा व्हिडीओ शेअर करताना अजित पवारांनी म्हटले आहे की, मी आज निवडणुकीच्या प्रचारासाठी जात असताना निवडणूक आयोगाने माझ्या हेलिकॉप्टरची आणि हेलिकॉप्टरमधील बँगांची तपासणी केली. मी यावेळी त्यांनी पूर्ण सहकार्य केलं. मुक्त आणि पारदर्शक निवडणुकीसाठी अशाप्रकारच्या अत्यावश्यक गोष्टी गरजेच्या असल्याचं माझं मत आहे. आपण सर्वांनी कायद्याचा आदर केला पाहिजे. या माध्यमातून आपण आपल्या लोकशाहीच्या मूल्यांची जोपासणा केली पाहिजे, असं म्हटलं आहे.