मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणामुळे अडचणीत सापडलेले मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay munde) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. धनंजय मुंडे हे बीडचे पालकमंत्री असताना ७३ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केला होता. याप्रकरणाची गंभीर दखल घेत अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांची चौकशी करण्यासाठी समिती नेमली असून मुंडेंवरील आरोपांची चौकशी समितीकडून करण्यात येणार आहे व याचा अहवाल अजित पवारांना (Ajit pawar) सादर केला जाईल. यामुळे धनंजय मुंडे यांचा पाय आणखी खोलात गेला आहे.
संतोष देशमुख प्रकरणात धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. त्यातच आता बीड जिल्हा नियेाजन समितीच्या निधी वाटपात दुजाभाव झाल्याचा आरोप धनंजय मुंडेंवर करण्यात आला आहे. या प्रकरणी धनंजय मुंडे यांची चौकशीचे आदेश अजित पवार यांनी दिले आहेत. तीन सदस्यीय चौकशी समिती स्थापन करून एका आठवड्यात अहवाल सादर करण्याचे आदेश अजित पवारांनी दिले आहेत.
२०२३-२४ आणि २०२४-२५ सालच्या जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत प्रशासकीय मान्यता दिलेल्या कामांची चौकशी केली जाणार आहे.अवर सचिव सुषमा कांबळी यांच्या आदेशान्वये स्थापन झालेल्या या पथकात तिघांचा समावेश आहे. यामध्ये धाराशिवचे उपजिल्हाधिकारी संतोष भोर हे अध्यक्ष असतील तर अर्थ आणि सांख्यिकी संचलनालय अपर संचालक एमके भांगे आणि जालना जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल सुर्यवंशी या तीन सदस्यीय पथक समिती चौकशी करणार आहे.
ही समिती जिल्ह्यात मंजूर झालेल्या कामांची सद्यस्थिती,त्या कामांना दिलेली तांत्रिक मान्यता आणि कार्यारंभ आदेश तसेच प्रशासकीय मान्यता दिलेली कामे,त्याकरिता निधी वितरण याची चौकशी करणार आहेत. या समितीने एका आठवड्यात हा अहवाल सादर करावा असे आदेश राज्याचे अवर सचिव सुषमा कांबळी यांनी दिले आहेत.
धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्याचे पालकमंत्री असताना परळी आणि अंबाजोगाईत काम न करता त्यांनी ७३ कोटींची बिले उचलल्याचा गंभीर आरोप सुरेश धस यांनी केला होता. डीबीटी योजनेला बगल देत मुंडे यांनी कृषी साहित्याची ज्यादा दराने खरेदी केल्याचा ठपका ठेवत त्या संदर्भात नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे धनंजय मुंडें गोत्यात आले आहेत.
संबंधित बातम्या