Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन-ajit pawar apologize to 13 crore people of maharashtra in latur for chhatrapati shivaji maharaj statue collapsed ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन

Ajit Pawar: मी महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेची माफी मागतो; दोषींना सोडणार नाही, अजित पवारांचे वचन

Aug 28, 2024 10:38 PM IST

Ajit pawar : अजित पवार यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दु:ख व्यक्त करत राज्यातील जनतेची माफी मागितली आहे.तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई केली जाईल, असे वचन दिले आहे.

अजित पवारांनी मागितली १३ कोटी जनतेची माफी
अजित पवारांनी मागितली १३ कोटी जनतेची माफी

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्यावर उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा ३५ फुटी भव्य पूर्णाकृती पुतळा केवळ ८ महिन्याच्या आतच कोसळला आहे. २६ ऑगस्ट रोजी दुपारच्या सुमारास पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. यावरून राज्यातील राजकीय वातावरणही तापलं आहे. पुतळा कोसळल्याबद्दल आता उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit pawar) यांनी जनतेची माफी मागितली आहे. याप्रकरणी राज्यातील १३ कोटी जनतेची मी माफी मागतो, अशी भावना अजित पवारांनी बुधवारी व्यक्त केली.

या प्रकरणात जे दोषी असतील त्यांची चौकशी केली जाईल. दोषींना सोडले जाणार नाही, कंत्राटदाराला  काळ्या यादीत टाकले जाईल. या दुर्दैवी घटनेबद्दल दु:ख व्यक्त करत अजित पवार म्हणाले मी वचन देतो की राज्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत. छत्रपती शिवाजी महाराज हे आपले दैवत आहेत. वर्षभरात त्यांचा असा पुतळा कोसळणे हा आपल्या सर्वांसाठी धक्कादायक आहे.

अजित पवारांची जन सन्मान यात्रा आज लातूर जिल्ह्यात पोहोचली. यावेळी येथील नागरिकांना संबोधित करताना अजित पवार यांनी शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी दु:ख व्यक्त करत राज्यातील जनतेची माफी मागितली आहे. तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करत दोषींवर कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले शिवाजी महाराजांनी सर्व जातिधर्माच्या लोंकांना सोबत घेऊन हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. तो इतिहास आपल्या सर्वांसमोर आहे. फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारधारेने पक्षाची वाटचाल सुरू आहे. कोणावरही अन्याय होऊ नये, ही आमची भूमिका आहे. त्यादृष्टीने सरकार काम करीत आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय घेतला. विरोधक यावर दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत.

 

अजित पवारांच्या सभेत मराठा कार्यकर्त्यांची घोषणाबाजी -
अहमदपूर येथील जिजाऊ हॉल येथे अजित पवार यांचे भाषण सुरू असतानाच सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला. त्यांनी एक मराठा, लाख मराठा, आरक्षण आमच्या हक्काचे, अशा घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर अजित पवार सभा संपवून जात असताना तरुणांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी घोषणा दिल्या.