बदलापूर पूर्व येथीलएका नामांकित शाळेत ४ वर्षांच्या दोन चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर राज्यात संतापात आगडोंब उसळला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतरही शाळा प्रशासन आणि पोलिसांनी तातडीने कोणतीही कारवाई न करता पीडितेच्या पालकांना १३ तास ताटकळत ठेवण्याने नागरिक संतप्त झाले व त्यांनी शाळेवर हल्ला करत तोडफोड केली. याप्रकरणात बदलापूरकर रेल्वे ट्रॅकवर उतरून रेल रोको केला. त्यानंतर प्रशासन व सरकारचीही पळापळ झाली. या प्रकरणावरून आता यवतमाळ येथील लाडकी बहीण योजनेच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संताप व्यक्त केला.
यवतमाळमध्ये जाहीर सभेत अजित पवार म्हणाले की, शक्ती कायदा मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवला आहे. या कायद्याच्या मंजुरीसाठी सरकार प्रयत्न करत आहे. राज्यात महिलांवर,मुलींवर अत्याचार करणाऱ्यांना कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे. त्यांना कायद्याचा धाक बसला पाहिजे. त्यांना अशी शिक्षा दिली पाहिजे जेणेकरून पुन्हा असे करण्याची कुणी हिंमत करणार नाही. आई-बहिणी व लेकींवर हात टाकणाऱ्यांना कडक शिक्षा दिली पाहिजे. माझ्या भाषेत सांगायचे तर त्यांचे सामानाच काढून टाकलं पाहिजे, परत नाहीच,हे केलचं पाहिजे, असा संताप त्यांनी व्यक्त केला.
जो चुकीचं वागेल त्याला शासन झालंच पाहिजे, तो कितीही मोठ्या बापाचा असू द्या किंवा कितीही मोठ्या वशिल्याचा असू द्या, त्याची फिकिर आम्ही करणार नाही. त्याला इतकं कडक शासन करणार. आमचा तर प्रयत्न सुरु आहे शक्ती कायदा दिल्लीत राष्ट्रपतींकडे गेला आहे, तो लवकर मंजूर करुन आणायचा आहे. अशा प्रकारची विकृत माणसं, ज्यावेळेस आमच्या आई-बहिणीला किंवा आमच्या मुलींच्या अंगावर हात टाकतात,त्यावेळेस त्यांना पुन्हा अशा काही कायद्याचा बडगा दाखवला पाहिजे, की पुन्हा त्यांच्या मनात तसा विचारही येता कामा नये.
युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला काय शिकवलं आहे. कशापद्धतीने आज काही लोक नालायकपणा करत आहेत. आज कुठं कुठं काही काही घटतंय, त्याच्याबद्दल कडक आणि ठोस भूमिका या सरकारने स्वीकारलेली आहे. विरोधकांनी त्यांच्या पद्धतीने जो काय विरोध करायचा तो करा. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मुभा आहे. त्याबद्दल मला काही बोलायचे नाही,असे अजित पवार म्हणाले.
राज्यात बदलापूर प्रकरणावरून मोर्चे, आंदोलने व निर्देशने होत आहेत. येथील एका नामांकित शाळेत शिशुवर्गातील दोन चिमुकलींवर शाळेतील सफाई कर्मचाऱ्याने लैंगिक अत्याचार केले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अक्षय शिंदे असं या आरोपीचं नाव असून त्याला२६ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.