sharad pawar: पुण्यात काका-पुतण्या समोरा समोर; निधीवरून बैठकीत खडाजंगी, अजित पवार म्हणाले, 'तुम्हाला बोलण्याचा अधिकार..'
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  sharad pawar: पुण्यात काका-पुतण्या समोरा समोर; निधीवरून बैठकीत खडाजंगी, अजित पवार म्हणाले, 'तुम्हाला बोलण्याचा अधिकार..'

sharad pawar: पुण्यात काका-पुतण्या समोरा समोर; निधीवरून बैठकीत खडाजंगी, अजित पवार म्हणाले, 'तुम्हाला बोलण्याचा अधिकार..'

Jul 20, 2024 08:21 PM IST

Sharad Pawar : पुणे डीपीडीसी बैठकीनिमित्त पवार काका-पुतणे पुन्हा समोरासमोर आले. या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यात थेट सवाल-जवाब पाहायला मिळाला.

 पुण्यात काका-पुतण्या समोरा समोर
पुण्यात काका-पुतण्या समोरा समोर

लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहत असून सर्वच पक्षाकडून तयारीला सुरुवात झाली आहे. येत्या दोन-तीन महिन्यात विधानसभेसाठी आचारसंहिता लागू होऊ शकते. गेल्या पाच वर्षात घडलेल्या घटना तसेच पक्षफुटीच्या पार्श्वभूमीवर विधानसभा निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार आणि अजित पवार पुण्यात बैठकीच्या निमित्ताने पुन्हा समोरासमोर आले आहेत. याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. पुण्यात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी शरद पवार, अजित पवार तसेच सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या.

पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत शरद पवार हेसुद्धा उपस्थित होते.. खासदार अमोल कोल्हे, खासदार सुप्रिया सुळे यासुद्धा उपस्थित होत्या. विरोधी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनी निधी वाटपावरून तक्रार केल्याने या बैठकीत जोरदार खडाजंगी झाली.

आजच्या डीपीडीसी बैठकीनिमित्त पवार काका-पुतणे पुन्हा समोरासमोर आले. या बैठकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीतील नेते आणि पालकमंत्री अजित पवार यांच्यात थेट सवाल-जवाब पाहायला मिळाला. तर, शरद पवार यांनीही बारामतीती दूषित पाणी येत असल्याचा मुद्दा उपस्थित केला. पवार बैठकीला पाच मिनिटे आधीच आले होते. त्यानंतर अजित पवार सभागृहात आल्यानंतर ते जागेवरून उठूनही उभे राहिले होते.

शरद पवारांचा अजित पवारांना प्रश्न -

शरद पवारांनी प्रश्न विचारला की, बारामतीत पाणी दूषित येत आहे, हात घातला की काळे पाणी येत आहे, त्या अनुषंगाने कारवाई करा. त्यावर, बारामती परिसरात काही कारखाने प्रदूषण करत आहेत, त्यासंदर्भात प्रदूषण बोर्डाशी बोलून नोटीसा पाठवायला सांगितल्या आहेत, कारखाने बंद केले तर शेतकऱ्यांची अडचण होईल, असे उत्तर अजित पवारांनी दिले. तर, सुप्रिया सुळे आणि अमोल कोल्हेंनीही निधीबाबत प्रश्न विचारले.

मावळ लोकसभेला निधी मिळतो मग आम्हाला का नाही, असा सवाल दोघांनी विचारला. यावर अजित पवार यांनी उत्तर देणं टाळलं. या प्रश्नावर जिल्हाधिकाऱ्यांनी बाजू मांडली. अजित पवार यांनी अमोल कोल्हेंना उत्तर देताना म्हटलं की, जिथे प्राथमिक आरोग्य केंद्रांची गरज आहे तिथे तालुके न पाहता मंजूर केलं. तरी तक्रार असेल तर तपास करून सांगतो.

आमदार-खासदारांना प्रश्न विचारण्याच आधिकार नाही – अजित पवार

या बैठकीत अजित पवार म्हणाले की, जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत आमदार खासदार हे फक्त निमंत्रित सदस्य आहेत.⁠ त्यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा, प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही. ⁠जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत फक्त समितीचे निवडून आलेले सदस्य त्यांचे प्रश्न त्यांची बाजू त्यांचे मुद्दे मांडू शकतात. नियमानुसार आमदार खासदार यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत बोलण्याचा प्रश्न मांडण्याचा अधिकार नाही.

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर