मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Vidhan Sabha : सभागृहात अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खडाजंगी; विकासकामांच्या स्थगितीवरून संघर्ष पेटला

Vidhan Sabha : सभागृहात अजित पवार आणि फडणवीसांमध्ये खडाजंगी; विकासकामांच्या स्थगितीवरून संघर्ष पेटला

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Dec 20, 2022 12:31 PM IST

Ajit Pawar vs Devendra Fadnavis In VidhanSabha : मविआनं मंजुर केलेल्या कामांना शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगिती दिली होती. त्यावरून सभागृहात विरोधी पक्षनेते अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं.

Ajit Pawar vs Devendra Fadnavis In VidhanSabha
Ajit Pawar vs Devendra Fadnavis In VidhanSabha (HT)

Maharashtra Assembly Winter Session Live Updates : राज्यात सत्तांतर झाल्यानंतर महाविकास आघाडी सरकारनं मंजुर केलेल्या हजारो कोटी रुपयांचा विकासकामांना शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगिती दिली होती. काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते अजित पवारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चाही केली होती. परंतु आता विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात विकासकामांच्या स्थगितीचा मु्द्दा चांगलाच गाजत आहे. सरकार जाणीवपूर्वक विकासकामांना स्थगिती देत असल्याचा आरोप अजित पवारांनी केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

विधानसभेत कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवारांनी विकासकामांच्या स्थगितीचा मुद्दा उपस्थित करताना म्हटलं की, राज्यात सत्तांतर होऊन सहा महिने झाली आहेत. यापूर्वीच्या सरकारनं अर्थसंकल्पात जी विकासकामं मंजुर केली होती ती सर्व व्हाईट बुकमध्ये आली होती. परंतु तरीही त्याला शिंदे-फडणवीस सरकारनं स्थगिती दिली. आतापर्यंत राज्यात अनेक सरकारं बदलली आहेत. परंतु व्हाईट बुकमध्ये आलेली विकासकामांना कधीही स्थगिती देण्यात आलेली नाही, ही विकासकामं गुजरात किंवा तेलंगणातली नाहीत, महाराष्ट्रातली आहे. तरीही सरकारनं त्याला स्थगिती कशी काय दिली?, असा सवाल करत अजित पवारांनी शिंदे-फडणवीस सरकारला त्याबाबत जाब विचारला.

त्यानंतर अजित पवारांनी केलेल्या आरोपांना उत्तर देताना अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ठाकरेंच्या नेतृत्वाखाली राज्यात मविआचं सरकार स्थापन झालं त्यावेळी त्यापूर्वीच्या सरकारनं मंजुर केलेली विकासकामं रोखण्यात आली होती. माझ्या नागपूर विधानसभा मतदारसंघातल्या विकासकामांना स्थगिती देण्यात आली होती. मविआचं सरकार असताना भाजपच्या आमदारांना एक नवा पैसा विकासकामांसाठी दिला नसल्याचा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला.

सरकार सूडभावनेनं काम करत नसून ७० टक्के विकासकामांची स्थगिती रद्द करण्यात आली आहे. निधीवाटप करताना कोणताही नियम पाळण्यात आलेला नव्हता, त्यामुळं आम्ही स्थगिती दिल्याचंही स्पष्टीकरण फडणवीसांनी दिलं. याशिवाय तुम्ही सात-सात वेळा निवडून आलेला आहात. आम्ही कमी वेळा निवडून आलो आहोत. परंतु काही गोष्टी आम्ही तुमच्याकडूनच शिकल्याचं सांगत फडणवीसांनी अजित पवार आणि बाळासाहेब थोरातांवर चिमटा काढला.

WhatsApp channel