Ajit Pawar Group MLA Meeting : लोकसभा निवडणुकांच्या निकालांमध्ये महायुतीला जोरदार फटका बसला आहे. महायुतीचे केवळ १७ खासदार निवडणून आले आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा केवळ एकच खासदार निवडून आला आहे. दरम्यान, झालेल्या पराभवावर आत्मचिंतन करण्यासाठी तसेच नाराज आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी आज मुंबईत हॉटेल ट्रायडन्टमध्ये ही बैठीक बोलावण्यात आली आहे.
अजित पवारांनी शरद पवार यांच्या विरोधात जाऊन बंड करत राष्ट्रवादी फोडली. पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत ४० हून अधिक आमदार होते. मात्र, लोकसभा निकाल लागल्यानंतर शरद पवारांना मोठे यश मिळाले. शरद पवारांनी १० पैकी ८ खासदार निवडून आणत आपणच पॉवरफुल्ल असल्याचे सिद्ध केले आहे. तर अजित पवारांचा एकच खासदार निवडून आला. अजित पवार हे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनाही निवडून आणू शकले नाहीत. आधी मुलाचा पराभव आणि आता पत्नीचा पराभव झाल्याने अजित पवार गटात चलबिचल सुरू झाली आहे. अनेक आमदार पुन्हा परतण्याची तयारी सुरू असतांना पक्षातील नाराजांची नाराजी दूर करण्यासाठी आज मुंबईत अजित पवारांनी सर्व आमदारांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला कोण उपस्थित राहणार आणि कोण नाही या कडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मुंबईत हॉटेल ट्रायडन्टमध्ये ही बैठीक बोलावण्यात आली आहे. पण, अजित पवारांच्या या बैठकीला काही आमदार पाठ फिरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. लोकसभा निवडणूकीत झालेला पराभव पाहता काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. त्याच पार्श्वभूमीवर ही बैठक आयोजित करण्यात आली आहे. केंद्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या एक मंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. तर शिवसेनेला एक राज्यमंत्री व एक कॅबिनेट पद मिळण्याची शक्यता आहे.
अजित पवार यांनी बंडखोरी केली. त्यांनी सत्ताधारी भाजपच्या गटात प्रवेश केला. त्यांना मूळ राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह देखील मिळाले. तर शरद पवार यांना दुसरे पक्ष चिन्ह व नाव मिळाले. मात्र, शरद पवार यांच्या सोबत बंडखोरी केल्याने अनेक आमदार पूर्वी पासून नाराज होते. तर आता लोकसभा निवडणूकीत पक्षाचा दारुण पराभव झाल्याने याचा फटका येणाऱ्या विधानसभा निवडणूकीत देखील बसण्याची शक्यता आहे. दरम्यान, आज राष्ट्रवादीच्या बैठकीत कोणत्या मुद्द्यावर चर्चा केली जाणार या बाबाद देखील अनेकांना उत्सुकता आहे.