Ajit Pawar Funny Comment : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार हे त्यांच्या रोखठोक आणि मिश्किल स्वभावासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांच्या एका विधानाने गंभीर वातावरण देखील हलकं फुलकं होत असतं. दादांच्या अशाच मिश्किल स्वभावाचा अनुभव पुण्यातील पत्रकारांना गुरुवारी आला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे गुरुवारी पुणे दौऱ्यावर होते. त्यांच्या हस्ते विविध विकास कामांचे व चाकण येथील आधुनिक क्षेपणास्त्र संकुलाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी हाती ए.के. ४७ धरत, निशाणा साधला. यावेळी त्यांनी त्यांच्या हातातील बंदूक ही थेट माध्यम प्रतिनिधींवर रोखली व मिश्किलपणे म्हणाले, महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, नाही तर उडवून टाकू. दादांच्या या विधानामुळे हशा पिकला.
राज्यात बीड येथील मस्साजोग येथील सरंपच संतोष देशमुख यांच्या हत्येमुळे अजित पवार व धनंजय मुंडे यांच्यावर प्रसारमाध्यमांत विविध बातम्या येत आहेत. तसेच विरोधक देखील सत्ताधारी महायुतीवर निशाणा साधत असल्याने त्यांच्याही बातम्या प्रसिद्ध होत आहे. त्यामुळे आज अजित पवार यांनी संधी भेटताच या पद्धतीने माध्यमांवर निशाणा साधला. महायुतीच्या चांगल्या बातम्या द्या, अन्यथा आम्ही दोघे तुम्हा सर्वांना उडवून टाकू, असे म्हणत अजित पवार यांनी त्यांच्या हातातील ए.के.४७ रायफल ही माध्यमप्रतिनिधींच्या दिशेने वळवली. यानंतर एकच हशा पिकला. “आता हे एवढंच छापतील, असे देखील पवार म्हणाले.
दोघांचाही हा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील तो त्यांच्या ट्विटर हँडलवर शेअर एलया आहे. फडणवीस आणि अजित पवार हे दोघेही हातात एके ४७ घेऊन दिसत आहे. तसेच व्हिडिओमध्ये कॅबिनेट मंत्री उदय सामंत व कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटील देखील आहेत.
संबंधित बातम्या