mumbai police traffic advisory: मुंबईच्या मरीन ड्राइव्ह येथे १३- १४ जानेवारीपर्यंत मुंबई एअर शो २०२४ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे. या कार्यक्रमादरम्यान मुंबईतील अनेक रस्ते वाहतुकीसाठी बंद असतील. यामुळे मुंबई वाहतूक पोलिसांनी प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी शहरतील कोणते रस्त बंद असतील. तसेच पर्यायी मार्गांबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या वेळेत एनएस रोडला नो-पार्किंग झोन करण्यात येणार असून मादाम कामा रोडवरून वाहनांना प्रवेश प्रतिबंधित केला जाईल. एनसीपीए ते गोरगाव चौपाटी हा रस्ता बंद राहणार आहे. यामुळे वाहनधारकांना रामनाथ पोद्दार चौक (गोदरेज जंक्शन), महर्षी कर्वे रोड-अहिल्याबाई होळकर चौक (चर्चगेट जंक्शन)- मरीन लाइन्स-चर्नी रोड-ऑपेरा हाऊस या पर्यायी मार्गाचा वापर करावा लागणार आहे.
गिरगाव चौपाटी ते एनसीपीए, हुतात्मा राजगुरू चौक (मंत्रालय जंक्शन) पर्यंत एनएस रोड दक्षिण बाजू वाहतुकीसाठी बंद राहील. तर, केम्प्स कॉर्नर पूल-नाना चौक-एनएस पाटकर मार्ग-पंडित पलुस्कर चौक-एसव्हीपी रस्ता पर्यायी मार्ग म्हणून सुरु असतील.
वीर नरिमन रोड अहिल्याबाई होळकर चौक ते किलाचंद चौक (सुंदर महाल जंक्शन) पर्यंत वाहतूक बंद राहणार आहे. अहिल्याबाई होळकर चौक-मरीन लाईन्स-चर्नी रोड-ऑपेरा हाऊस हे पर्यायी मार्ग आहेत.
दिनशॉ वाचा रस्ता देखील रतनलाल बाबुना चौक (मरीन प्लाझा जंक्शन) पर्यंत बंद राहील. बॅरिस्टर रजनी पटेल मार्ग फ्री प्रेस जंक्शन ते एनएस रोड (स्थानिक रहिवासी आणि आपत्कालीन वाहने वगळून) बंद राहील. विनय के शाह मार्गाचा जमनालाल बजाज मार्ग ते मुरली देवरा चौक-एनएस रोड (स्थानिक रहिवासी आणि आपत्कालीन वाहने वगळून) पर्यंतचा उत्तरेकडील भाग देखील एअर शो दरम्यान वाहतुकीसाठी बंद राहील. या सर्व रस्त्यांवर १३ जानेवारी रोजी सकाळी ७ वाजल्यापासून १४ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत पार्किंगला परवानगी दिली जाणार नाही.