मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  imtiaz jaleel news : मराठे मुंबईत येऊ नयेत म्हणून घडवण्यात आलं मीरारोड प्रकरण; खासदाराचा गंभीर आरोप

imtiaz jaleel news : मराठे मुंबईत येऊ नयेत म्हणून घडवण्यात आलं मीरारोड प्रकरण; खासदाराचा गंभीर आरोप

Jan 24, 2024 02:13 PM IST

Imtiaz Jaleel on Mira Road Incident : मीरारोडमध्ये दोन गटात झालेल्या हिंसाचाराच्या प्रकरणावरून एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला आहे. मनोज जरांगे यांचा मराठा मोर्चा रोखण्यासाठी हे प्रकरण घडवण्यात आल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

Imtiaz Jaleel
Imtiaz Jaleel

Imtiaz Jaleel on Mira Road Incident : अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या आदल्या रात्री मीरारोडमध्ये दोन गटांत झालेल्या हिंसाचारावरून आता राजकारण सुरू झालं आहे. भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी तिथं जाऊन पत्रकार परिषद घेतल्यानंतर आता एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी राज्यातील सरकारवर गंभीर आरोप केला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

'मीरारोडची घटना म्हणजे मनोज जरांगे पाटील यांचा शांततापूर्ण मोर्चा अस्थिर करून लक्ष विचलित करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न असल्याचं दिसून येत आहे. लाखो मराठ्यांनी मुंबई गाठावी अशी सरकारची इच्छा नाही. त्यामुळं ते जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्यासाठी ते मुस्लिमांना हत्यार म्हणून वापरण्याची त्यांची जुनी रणनीती वापरत आहेत, असा दावा इम्तियाज जलील यांनी केला आहे.

Manoj Jarange Patil : मुंबईच्या आंदोलनाचा पुण्यात ट्रेलर! मनोज जरांगेंसह लाखो मराठे रस्त्यावर; पाहा फोटो

‘मीरारोड हा संवेदनशील परिसर असल्याचं माहीत असताना तिथं सुरक्षेची योग्य व्यवस्था करण्यात आली नाही. दंगलखोरांना मोकळं रान देण्यात आलं आणि पोलीस मूक प्रेक्षक बनले. सी ग्रेडच्या नेत्यांना द्वेषपूर्ण वक्तव्ये करून वातावरण बिघडवण्याची परवानगी का दिली जात आहे?,’ असा सवालही जलील यांनी केला आहे.

'हिंसा सहन केली जाऊ नये. पोलिसांनी राजकीय आचार्‍यांच्या दबावाखाली न जाता पूर्ण प्रामाणिकपणे आपलं काम करावं. महाराष्ट्र शांत राहावा अशी आमची इच्छा आहे, असंही जलील पुढं म्हणाले.

मराठा आरक्षण मोर्चा लोणावळ्यात

मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली जालना जिल्ह्यातून निघालेली पदयात्रा सध्या पुणे जिल्ह्यात पोहोचली आहे. लोणावळा इथं आज जरांगे पाटील पदयात्रेत सहभागी झालेल्या मराठा बांधवांना संबोधित करणार आहेत.

mamata banerjee : मोठी बातमी! पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी स्वबळावर निवडणूक लढणार, इंडिया आघाडीला धक्का

'सरकारला वेळ देऊनही आरक्षणाबाबत निर्णय घेण्यात आला नाही. उलट राज्य सरकार वेगवेगळ्या मार्गांनी मराठा बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप जरांगे पाटील यांनी केला आहे. मराठा समाजाच्या पदयात्रेकडं दुर्लक्ष करण्याची रणनीती सरकारनं आखली आहे, असा आरोपही जरांगे यांनी केला आहे. त्यामुळं सरकारच्या भूमिकेविषयी संशय निर्माण झाला असतानाच आता जलील यांच्या आरोपामुळं खळबळ उडाली आहे.

नीतेश राणे मीरारोडमध्ये

भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी आज मीरारोडमध्ये जाऊन पत्रकार परिषद घेतली. हिंदू जनतेवर कोणीही हल्ला केल्यास आम्ही शांत राहणार नाही. हे महाविकास आघाडीचं सरकार नाही. हिंदुत्ववादी सरकार आहे. इथं मस्ती चालणार नाही. विनाकारण कोणी गृहमंत्र्यांची बदनामी करत असेल तर आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा नीतेश राणे यांनी दिला.

 

WhatsApp channel