Chhatrapati Sambhajinagar: शिंदे-फडणवीस सरकारने पाठवलेल्या औरंगाबाद शहराच्या नामांतराला केंद्रीय गृहमंत्रालयानं ग्रीन सिग्नल दिला आहे. त्यानंतर आता प्रशासनाकडून जिल्ह्याच्या नामांतराची प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू झाली आहे. परंतु, एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील यांनी जिल्ह्याच्या नामांतराला विरोध दर्शवला आहे. औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निषेधार्थ इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वात मोठ्या संख्येने गुरुवारी रात्री कँडल मार्च काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालय ते भडकल गेट डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत हा कँडल मार्च काढण्यात आला.
"हा कोणताही राजकीय स्टंट नाही. हे माझं शहर आहे. या शहरासोबत आमच्या भावना जोडल्या गेल्या आहेत. आमच्या शहराचे नाव मुंबई आणि दिल्लीत बसून हिसकावून घेऊ शकत नाही. देशात लोकशाही, तुमची हुकूमशाही चालणार नाही, त्यामुळे नामांतराचा निर्णय आम्हाला मान्य नाही", औरंगाबादच्या नामंतराबाबत इम्तियाज जलिल यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुढे इम्तियाज जलील म्हणाले की, "तुम्हाला औरंगाबाद शहराचे नाव बदलायचे असेल तर मतदान घेऊन नाव बदलून दाखवा, नामांतराच्या बाजूने जास्त मत पडली तर आम्हीही नामांतराचा निर्णय मान्य करु. दारूबंदी करायची असेल तेव्हा... आमदार, खासदार ,नगरसेवक निवडायचे असेल, तेव्हा मतदान घेतले जाते. मग नामांतर करण्यासाठी का मतदान घेतले गेले नाही? असा सवाल देखील जलील यांनी उपस्थित केला आहे