औरंगाबद आणि उस्मानाबादनंतर आता अहमदनगरच्या नामांतराची मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगरचे नामांतर अहिल्यादेवी नगर केलं जाणार, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात केली. अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अहमदनगरमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे.
औरंगाबादचे नाव छत्रपती संभाजीनगर, उस्मानाबादचे नाव धाराशीव केल्यानंतर आता अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानंतर करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आहे. अहमदनगरमधील चौंडी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मस्थानी आयोजित जयंतीच्या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगरचे नाव आता अहिल्यानगर झाल्याची घोषणा केली.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि राम कदम यांनी गेल्या अनेक दिवसांपासून अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर करावं, अशी मागणी केली होती. तसेच मंगळवारी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनीही अहमदनगरच्या नामांतराची मागणी राज्य सरकारकडे केली होती.
राज्य सरकारने काही महिन्यांपूर्वीत औरंगाबादचं नामांतर छत्रपती संभाजीनगर तर उस्मानाबादचं नामांतर धाराशिव असं केलं होतं. आता या दोन शहरांनंतर अहमदनगरचंही नामांतर होणार आहे. नामांतराचा हा प्रस्वात आता मंत्रिमंडळ बैठकीत ठेवला जाईल आणि त्यानंतर मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर हा प्रस्ताव केंद्राच्या मंजुरीसाठी पाठवला जाईल. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर अहमदनगरचं नामांतर अहिल्यादेवी नगर होईल.
संबंधित बातम्या