Ahmednagar murder: नाशिक येथे बायकोने संपत्तीसाठी नवऱ्याला दारू पाजून सर्पदंश करून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना ताजी असतांना अहमदनगर येथे एका पत्नीने प्रियकरासाठी दीड लाख रुपयांची सुपारी देऊन आपल्या पतीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपी पत्नी, तिच्या प्रियकरासह पुण्यातून पाच आरोपींना अटक केली आहे. दरम्यान पत्नीनेच या प्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. फिर्यादीच आरोपी निघल्याने खळबळ उडाली आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील कोथूळ येथे योगेश सुभाष शेळके या तरुणाच्या खुनाचा उलगडा करण्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराने योगेशच्या खुनाचा कट रचला. आरोपी पत्नी, प्रियकर रोहित साहेबराव लाटे, अनिश सुरेंद्र धडे याच्यासह आणखी काही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत योगेश हा पत्नी आणि आई- वडिलांसह कोथूळ येथे राहत होता. त्याच्या पत्नीचे रोहित साहेबराव लाटे या तरुणासोबत प्रेमसंबंध होते. याचा संशय योगेशला होता. यामुळे तो पत्नीला मारहाण करत होता. त्याच्या सततच्या त्रासाला कंटाळलेल्या पत्नीने प्रियकर साहेबराव सोबत योगेशच्या खुनाचा कट १५ दिवसांपूर्वी रचला.
रोहित सध्या पुण्यात राहत होता. त्याने पुण्यातून हल्लेखोरांची निवड केली. या साठी त्याने अनिश सुरेंद्र धडेची मदत घेतली. त्याने पुण्यातीलच चौघांना तब्बल दीड लाख रुपये दिले. प्रियकर साहेबराव लाटे, सुरेंद्र धडे व चार हल्लेखोर पुण्यातून दुचाकीवरून मंगळवारी पहाटे कोथूळ येथे गेले. त्यांनी पाहते ३ च्या सुमारास योगेशच्या घरी जात योगेशवर धारदार शस्त्राने वार करून हत्या केली.