संपूर्ण देशात होळीचा उत्साह असताना अहमदनगर जिल्ह्यातून एक भयंकर घटना समोर आली आहे. येथे एका पतीने चारित्र्यांच्या संशयातून पत्नीसह दोन चिमुकल्या मुलींना जिवंत जाळलं. आरोपीने दारुच्या नशेत हे कृत्य केल्याचे सांगितले जात आहे. ही धक्कादायक घटना अहमदनगर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे घडली आहे.
सुनिल लांगले असे आरोपीचे नाव आहे. त्यांना २६ वर्षीय पत्नी लिलाबाई व दोन मुली साक्षी (१४ वर्षे) व खुशी (९ वर्षे) यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना जाळले. ही घटना आज (सोमवार) सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास घडली. पतीच्या डोक्यावर संशयाचे भूत असं काही बसलं होतं की, पत्नी व मुलींना घरात जिवंत जाळल्यानंतर तो अंगणातील झाडाखाली निवांत बसून राहिला होता.
आरोपीने पत्नीसह दोन मुलींना जिवंत जाळून घराला बाहेरून कडी घातली होती. दोन मुलीसह पत्नीला जिवंत जाळल्याच्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
आरोपी सुनिल लांडगे यांनी दारूच्या नशेत आपले अख्खे कुटूंब संपवले आणि तसाच झाडाखाली बसून राहिला. पत्नीला जिवंत जाळताना ती जीवाच्या आकांताना ओरडत होती, माझ्या पाया पडत होती, असंही तो बडबडत होता. शेजारच्या लोकांनी हे पाहिल्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले व पंचनामा केला..
तीन जणींना जिवंत जाळल्याच्या घटनेत पत्र्याची खोलीसुद्धा जळून खाक झाली आहे. पोलिसांनी पत्र्याच्या घरातून तिघींचे मृतदेह बाहेर काढले असून तिघींच्या शरीराचा पार कोळसा झाला होता.