Palghar : पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता पालघरमध्ये सापडलं मोठं घबाड, पोलिसांचा तपास सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Palghar : पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता पालघरमध्ये सापडलं मोठं घबाड, पोलिसांचा तपास सुरू

Palghar : पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता पालघरमध्ये सापडलं मोठं घबाड, पोलिसांचा तपास सुरू

Oct 31, 2024 08:05 AM IST

Palghar cash seized News: पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता पालघरमध्ये पोलिसांना मोठे घबाड सापडल्याची माहिती समोर आली.

पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता पालघरमध्ये सापडलं मोठं घबाड
पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता पालघरमध्ये सापडलं मोठं घबाड

Maharashtra assembly Election 2024: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केल्यानंतर राज्यात आचारसंहिता लागू केली. आचारसंहिता काळात कुठलेही गौरव्यवाहार होऊ नयेत, यासाठी पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे. तसेच नाक्या-नाक्यावर वाहनांची तपासणी सुरू आहे. मात्र, दररोज कुठे ना कुठे रोकड किंवा अवैध पैसे, वस्तू जप्त केल्या जात आहेत. पुणे, नागपूर, मुंबईनंतर आता पालघरमध्ये जवळपास पाच कोटींची रोकड जप्त करण्यात आली.ही रोकड दादरा नगर हवेलीतून महाराष्ट्रात येत असताना ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, पालघर जिल्ह्यातील तलासरीच्या उधवा येथे नाकाबंदी असताना तलासरी पोलिसांना एका व्हॅनमध्ये ४ कोटी ३३ लाखांची रोकड आढळून आली. पोलिसांनी त्वरीत व्हॅनसह रोकड जप्त करून पुढील कारवाईला सुरुवात केली आहे. मात्र, या घटनेनंतर तलासरी येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. निवडणुकांमध्ये सर्रासपणे पैशाचा वापर होत असून याची कसून तपासणी आता निवडणूक आयोगाने करावी, अशी मागणी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे डहाणूचे आमदार विनोद निकोल यांनी केली.

नांदेडमधून एक कोटी पाच लाख रुपयांची रोकड जप्त

निवडणुकीची आचारसंहिता लागू असताना नांदेड जिल्ह्यात एका कारमधून पोलिसांनी एक कोटी पाच लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. नांदेडच्या भाग्यनगर परिसरातील चेकपोस्टवर पोलिसांच्या पथकाने चारचाकी गाडी अडवली असता गाडीत रोख रक्कम आढळून आली. "आम्ही पैशांचा स्त्रोत आणि ते कोठे नेले जात होते याची पडताळणी करत आहोत. तसेच बँकेशी समन्वय साधला आहे, अशी माहिती नांदेडचे पोलिस अधीक्षक अविनाश कुमार यांनी दिली.

मुंबईतील चेंबूर येथे कारमधून २० लाख रुपयांची रोकड जप्त

मुंबई पोलिसांनी चेंबूर परिसरात एका कारमधून 20 लाख रुपयांची रोकड जप्त केली असून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी घडली. मुंबईतील चेंबूर परिसरात तपासणी नाक्यावर छापा टाकला असता एका कारमधून पोलिसांना २० लाख ांची रोकड सापडली. ही रोकड सापडल्यानंतर मुंबईतील टिळकनगर पोलिसांनीही प्राप्तिकर विभागाशी संपर्क साधला.

 

महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. या संहितेनुसार, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड बाळगणाऱ्या व्यक्तींकडे वैध कागदपत्रे असणे आवश्यक आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर ला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबर रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. तर, शिवसेना आणि काँग्रेसला अनुक्रमे ६३ आणि ४२ जागा मिळाल्या होत्या. 

Whats_app_banner
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर