Mumbai Chembur Cash Seized: विधानसभा निवडणुकीला अवघे आठवडे शिल्लक असताना मुंबई पोलिसांनी चेंबूर परिसरात एका कारमधून २० लाख रुपयांची रोकड जप्त केली असून अनेकांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. ही घटना शुक्रवारी घडली.
महाराष्ट्रात निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्यानंतर आचारसंहिता लागू झाली आहे. या संहितेनुसार, ५० हजार रुपयांपेक्षा जास्त रोकड बाळगणाऱ्या व्यक्तींकडे वैध कागदपत्रे असणे आवश्यक आहे.
आगामी विधानसभा निवडणुकीची जय्यत तयारी सुरू असतानाच महायुती आणि महाविकास आघाडी दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपावरून मतभेद दूर करण्यासाठी अनेक बैठका सुरू आहेत. भाजप, शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस सत्ताधारी महायुतीचा भाग आहे. तर, शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) आणि काँग्रेस महाविकास आघाडीचा भाग आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबर २०२४ ला मतदान होणार आहे. तर, २३ नोव्हेंबर २०२४ रोजी सर्व २८८ जागांसाठी मतमोजणी होणार आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला १०५, शिवसेनेला ५६ आणि काँग्रेसला ४४ जागा मिळाल्या होत्या. २०१४ मध्ये भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या, त्यात शिवसेनेला ६३ आणि काँग्रेसला ४२ जागा मिळाल्या होत्या.
गृहमंत्री अमित शहा आणि भाजपप्रणित महायुतीच्या नेत्यांमध्ये गुरुवारी दिल्लीत महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यासह चंद्रशेखर बावनकुळे, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आदी उपस्थित होते.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात व्यस्त आहेत. नुकतीच भाजपने आपल्या २२ उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळच्या लोकांना उमेदवारी देण्यात आल्याचे दिसून आले. या आधी भाजपने ९९ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली होती. भाजपने आतापर्यंत १२१ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.