कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी तयार केलेला राज्यात शेतकऱ्यांना ‘नॅनो युरिया’ व ‘नॅनो डीएपी’ वितरित करण्याच्या प्रस्तावाला विरोध केल्यामुळे कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही. राधा यांची विभागातून तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने आज, सोमवारी राधा यांची मंत्रालयात सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव (सेवा) म्हणून बदली करण्यात आली आहे. राधा यांची दोनच महिन्यांपूर्वी कृषी विभागाच्या प्रधान सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. १९९४ च्या बॅचच्या महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी असलेल्या व्ही राधा या तब्बल आठ वर्ष दिल्लीत निती आयोगामध्ये सचिव पदावर प्रतिनियुक्तीवर कार्यरत होत्या. दोन महिन्यांपूर्वी राज्य सरकारने त्यांची राज्याच्या कृषी विभागाच्या सचिवपदी नियुक्ती केली होती. दरम्यान, सध्या कृषी सचिव या पदावर राज्य सरकारने कुणाचीच नवीन नियुक्ती जाहीर केलेली नाही. त्यामुळे व्ही राधा यांना विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळण्याचे सांगण्यात आले आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार राज्यातील शेतकऱ्यांना पीकांवर फवारणीसाठी नॅनो युरिया आणि नॅनो डीएपी बाटल्यांचे वाटप करण्याची १४०० कोटी रुपयांची महत्वाकांक्षी योजना कृषी विभागाने आखली होती. कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी या योजनेचा प्रस्ताव मंजुरीसाठी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठेवला होता. या योजनेला १४०० कोटी रुपये खर्च अपेक्षित असल्याने ‘योजनेसाठी पैसे कुठून आणणार’ असा प्रश्न अर्थमंत्री अजित पवार यांनी धनंजय मुंडे यांना विचारला होता. अजित पवार यांच्या प्रश्नाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुजोरा दिला होता, अशी सूत्रांची माहिती आहे.
दरम्यान, ‘नॅनो युरिया’ आणि ‘नॅनो डीएपी’च्या बाटल्या खरेदीसाठी शेतकरी सन्मान निधीचा राज्य शासनाचा एक हप्ता वळवण्याचा पर्याय मुंडे यांनी सूचवला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली. मात्र यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत एकमत झाले नसल्याचे सूत्रांचे म्हणणे होते. कृषी विभागाच्या प्रधान सचिव व्ही राधा यांनीसुद्धा १४०० कोटी रुपयांच्या या योजनेवर काही आक्षेप नोंदवले होते, अशी माहिती आहे. खरीपाचा हंगाम सुरू होऊन बराच कालावधी उलटलेला आहे. त्यामुळे चालू हंगामात शेतकऱ्यांना नॅनो युरिया आणि नॅनो डीएपीच्या बाटल्यांचे वाटप करून फार काही लाभ होणार नाही, अशी भूमिका व्ही. राधा यांनी घेतली होती, असे कळते. दरम्यान, राधा यांनी घेतलेल्या भूमिकेमुळे १४०० कोटी रुपयांच्या योजनेबाबत कृषी खात्याचे मंत्री आणि सचिव यांच्यातच एकमत नसल्याचे स्पष्ट झाले होते. कृषी विभागाच्या सचिवाने घेतलेल्या भूमिकेमुळे धनंजय मुंडे यांनी व्ही राधा यांच्याविरोधात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केली होती, असं सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे दोनच महिन्यांपूर्वी कृषी विभागात नियुक्ती झालेल्या प्रधान सचिव व्ही राधा यांच्यावर पुन्हा बदलीचे संकट ओढवणार असं मंत्रालयाच्या वर्तुळात बोललं जात होते.