मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  कृषीमंत्री अब्दुल सत्तार विदर्भात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना भेटले; तत्काळ मदतीचे आश्वासन

कृषीमंत्री अब्दुल सत्तार विदर्भात अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना भेटले; तत्काळ मदतीचे आश्वासन

HT Marathi Desk HT Marathi
Aug 19, 2022 11:41 PM IST

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विदर्भातील वर्धा आणि अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. सत्तार यांनी दोन्ही जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

Agriculture minister Abdul Sattar visited rain affected Farmers
Agriculture minister Abdul Sattar visited rain affected Farmers

राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी विदर्भातील वर्धा आणि अमरावती जिल्ह्याचा दौरा केला. यावेळी सत्तार यांनी दोन्ही जिल्ह्यातील अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना तत्काळ मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले. शासन अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असून एकही बाधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, असा विश्वास मंत्री सत्तार यांनी आज व्यक्त केला.

वर्धा जिल्ह्यात पाहणी

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सेलू तालुक्यातील लोंढापूर, कोल्ही व वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे नुकसानीची कृषिमंत्र्यांनी पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते. वर्धा जिल्ह्यात जवळपास दोन लाख हेक्टरवर शेतपिकांचे नुकसान झाले आहे. शासन दोन हेक्टर पर्यंतच्या नुकसानीला मदत देते. परंतु मुख्यमंत्र्यांनी तीन हेक्टर पर्यंत मदत देण्याचे जाहीर केले आहे. त्याप्रमाणे पंचनामे करून लवकरात लवकर मदतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्याचे नियोजन आहे. पंचनामे करतांना ते बोगस होणार नाही आणि सत्य पंचनामे लपविले जाणार नाही, अशा सुचना केल्या आहे. त्याप्रमाणे अधिकारी पंचनामे करत असल्याचे पुढे बोलतांना कृषिमंत्री सत्तार यांनी सांगितले. जिल्ह्यात सेलु तालुक्यातील लोंढापुर शिवारात नाल्याच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. लगतच्या कोल्ही-घोराड पांदनीचे झालेले नुकसान देखील पाहिले. येथे शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. अनेक शेतकऱ्यांनी आपले दु:ख यावेळी व्यक्त केले. शेतकऱ्यांनी काही मागण्या केल्या त्या देखील त्यांनी समजून घेतल्या.

वर्धा तालुक्यातील सेलसुरा येथे भदाडी नदीच्या पुरामुळे शेतजमीनी खरडून गेल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यानुकसानीची देखील त्यांनी पाहणी केली. याठिकाणी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांचे म्हणणे व दु:ख त्यांनी जाणून घेतले. जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॅा.मानकर यांनी जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती यावेळी मंत्रीमहोदयांना अवगत केली. तीन विभागातील सात जिल्ह्याची नुकसानीची पाहणी करणार असून त्यानंतर शासनास अहवाल सादर करणार असल्याचे यावेळी कृषिमंत्री सत्तार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले.

अमरावती जिल्ह्यात पाहणी

सत्तार यांनी आज अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील मौजा बोरगांव धांदे, मौजा रायपूर (कासारखेड ), मौजा इसापूर तसेच मौजा भातकुली येथील अतिवृष्टीमुळे बाधित शेतकऱ्यांच्या बांधावर जावून शेतकरी, ग्रामस्थांशी संवाद साधला. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेतल्या.

अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वे तालुक्याचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६३९३२.७१ हेक्टर आहे. सर्वसाधारण पेरणी खालील क्षेत्र ५५३२३.२० हेक्टर एवढे आहे. सद्यस्थितीत तालुक्यामध्ये खरीप हंगामामध्ये ५४३०२.०० हेक्टर क्षेत्रावर पेरणी झालेली आहे. आतापर्यंत या तालुक्यात एकूण ७७७.९० मिमी (१३३.७ टक्के ) पावसाची नोंद झालेली आहे. जून- जुलै महिन्याचे सर्वसाधारण पर्जन्यमान झालेले आहे. जुलै महिन्यातील सततचा पाऊस व अतिवृष्टीमुळे अंदाजे ४४१०४.०० हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे .

यावेळी कृषी सहसंचालक किसन मुळे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल खर्चान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या प्रादेशिक संशोधन केंद्राच्या प्रमुख वर्षा टापरे, महसूल उपविभागीय अधिकारी इब्राहिम चौधरी, धामणगाव रेल्वे तालुका कृषी अधिकारी राजेश वालदे , उपविभागीय कृषी अधिकारी माणिक त्र्यंबके तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

 

WhatsApp channel

संबंधित बातम्या