मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Agnipath: महिंद्रा समूह देणार अग्निवीरांना नोकरी, आनंद महिंद्रा यांची घोषणा

Agnipath: महिंद्रा समूह देणार अग्निवीरांना नोकरी, आनंद महिंद्रा यांची घोषणा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Jun 20, 2022 09:59 AM IST

Anand Mahindra on Agnipath: 'अग्निपथ' योजनेवरून देशभरात गदारोळ सुरू असताना महिंद्रा समूहाचे सर्वेसर्वा आनंद महिंद्रा यांनी अग्निवीरांना नोकरी देण्याची घोषणा केली आहे.

Anand Mahindra
Anand Mahindra

Anand Mahindra on Agniveer: लष्करी भरतीसाठी केंद्र सरकार आणलेल्या 'अग्निपथ' योजनेस देशभरात विरोध होत आहे. लष्करात कंत्राटी पद्धती आणून तरुणांना बेरोजगार करण्याचा हा प्रयत्न आहे, असा आक्षेप विरोधकांनी व युवा संघटनांनी घेतला आहे. त्यावरून अनेक राज्यांत आंदोलन पेटलं आहे. सरकारच्या बाजूनं यावर खुलासे सुरू असून सरकारच्या काही विभागात अग्निवीरांना प्राधान्य देण्याची घोषणा करण्यात आली आहे. आता खासगी क्षेत्रांतूनही अग्निवीरांना ऑफर देण्यात आली आहे. अग्निवीरांना महिंद्रा समूहामध्ये नोकरी देण्याची घोषणा आनंद महिंद्रा यांनी केली आहे.

आनंद महिंद्रा यांनी या संदर्भात ट्वीट केलं आहे. अग्निपथ योजनेला होत असलेला विरोध व त्यावरून होत असलेला हिंसाचार वेदनादायी आहे. मागील वर्षी या योजनेवर विचार सुरू करण्यात आला होता. या योजनेमुळं शिस्तबद्ध व कुशल तरुण तयार होतील. त्यातून त्यांच्यासाठी रोजगाराच्या संधी वाढतील, असं मत त्यावेळी मी नोंदवलं होतं. आजही मी त्यावर ठाम आहे. कॉर्पोरेट जगतासाठी अग्निवीरांची भरती ही एक संधी आहे. नेतृत्वगुण, संघभावना व शारीरिक प्रशिक्षण घेतलेले अग्निवीर हे ऑपरेशन्स, अॅडमिनिस्ट्रेशन व सप्लाय चेन मॅनेजमेंट अशा अनेक विभागांमध्ये काम करू शकतील. महिंद्रा समूह अशा प्रशिक्षित व सक्षम तरुणांना नोकरी घेण्यास इच्छुक आहे,' असं त्यांनी ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

तत्पूर्वी, केंद्र सरकारच्या संरक्षण व गृह विभागानं अग्निवीरांना नोकरीत आरक्षण व प्राधान्य देण्याची घोषणा केली आहे. अग्निवीरांना केंद्रीय केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) व आसाम रायफल्स (Assam Rifles) मध्ये प्राधान्य देण्याचा निर्णय केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी घेतला आहे. तर, संरक्षण विभागात १० टक्के आरक्षण देण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी जाहीर केलं आहे. त्याशिवाय, वयोमर्यादाही शिथील करण्यात आली आहे. त्यानंतर आता कॉर्पोरेट जगतातून अग्निवीरांना पहिली ऑफर आली आहे. अन्य उद्योजक आनंदा महिंद्रा यांच्या पावलावर पाऊल ठेवतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

IPL_Entry_Point