मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Agasti karkhana: मधुकर पिचड यांचं संस्थान खालसा; आमदारकी, ग्रामपंचायतीनंतर कारखान्याची सत्ताही गेली!

Agasti karkhana: मधुकर पिचड यांचं संस्थान खालसा; आमदारकी, ग्रामपंचायतीनंतर कारखान्याची सत्ताही गेली!

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Sep 26, 2022 05:25 PM IST

Madhukar Pichad: भाजप नेते मधुकर पिचड यांची एकहाती सत्ता असलेल्या अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील पॅनलनं झेंडा फडकावला आहे.

Agasti Sahakari Sakhar Karkhana
Agasti Sahakari Sakhar Karkhana

Agasti Sahakari Sakhar Karkhana: काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीचे दिवस फिरल्याचं लक्षात येताच २०१९ च्या निवडणुकीपूर्वी भाजपवासी झालेले ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं अकोले तालुक्यातील राजकीय वर्चस्व राष्ट्रवादी काँग्रेसनं जवळपास मोडून काढलं आहे. आमदारकी, ग्रामपंचायतीनंतर पिचड यांची एकहाती सत्ता असलेला अगस्ती कारखानाही राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील पॅनलनं जिंकला आहे.  

मागील २८ वर्षांपासून अगस्ती सहकारी साखर कारखान्यावर पिचड यांचं एकहाती वर्चस्व होतं. मात्र, तालुक्यातील राजकीय समीकरणं बदलल्यामुळं कारखान्यातही त्यांच्यापुढं आव्हान होतं. पिचड यांना शह देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व विरोधकांनी शेतकरी समृद्धी मंडळाच्या माध्यमातून निवडणूक लढवली. कारखान्यातील २१ जागांसाठी काल ८७ टक्के मतदान झालं होतं. त्यानंतर झालेल्या मतमोजणीत कारखान्याचे उपाध्यक्ष सीताराम गायकर, कैलास वाकचौरे, अशोकराव भांगरे, आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी समृद्धी मंडळाची निर्विवाद सरशी झाल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, माजी आमदार वैभव पिचड यांचाही निवडणुकीत पराभव झाला.

मधुकर पिचड यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला सोडचिट्ठी देणं हे पक्षातील वरिष्ठ नेत्यांच्या जिव्हारी लागलं होतं. त्यामुळं अकोले तालुक्यात राष्ट्रवादीनं सुरुवातीपासूनच पिचड यांना घेरलं होतं. विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीच्या किरण लहामटे यांनी वैभव पिचड यांना पराभवाची धूळ चारली होती. त्यानंतर अकोलेतील राजूर ग्रामपंचायतीतील पिचड यांची सत्ताही राष्ट्रवादीनं खेचून घेतली होती आणि आता अगस्ती कारखान्यांवरही वर्चस्व मिळवलं आहे.

अगस्ती कारखान्यातील विद्यमान सत्ताधारी असलेल्या पिचड पिता-पुत्रांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तर, राष्ट्रवादीच्या नेतृत्वाखालील विरोधकांच्या पॅनलही कारखाना जिंकण्याचा चंग बांधला होता. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी खास सभाही घेतली होती. त्याचाही फायदा निवडणुकीत झाल्याचं बोललं जात आहे.

हा शरद पवार साहेबांच्या विचारांचा विजय

अकोले तालुक्यातील जनतेनं पिचड यांचं पॅनल शंभर टक्के नाकारलं असून हा विजय राष्ट्रवादीचा, पवार साहेबांच्या विचारांचा आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी दिली आहे.

WhatsApp channel