‘मोदी’ आडनावाची बदनामी केल्या प्रकरणात गुजरातेतील सूरत येथील दिवाणी न्यायालयाकडून दोन वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आल्यामुळं खासदारकी गमावलेल्या राहुल गांधी यांना आज सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला. सुप्रीम कोर्टानं सूरतच्या स्थानिक न्यायालयानं ठोठावलेल्या शिक्षेवर स्थगिती देत राहुल गांधी यांची खासदारकी पूर्ववत बहाल केली. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर देशभर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला आहे. कोर्टाच्या निर्णयानंतर आता राहुल गांधी यांना पुन्हा संसदेत जाऊन लोकसभेच्या कार्यवाहीमध्ये सहभाग घेणे शक्य होणार आहे.
दरम्यान, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर कॉंग्रेस पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक ट्विट करण्यात आलं असून ‘आ रहा हुं मैं…. सवाल जारी रहेंगे’ अशा आशयाचं ट्विट करण्यात आलं आहे. लोकसभेच हिंडेनबर्ग अहवालावर चर्चा सुरू असताना राहुल गांधी यांनी उद्योगपती अदानी आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एकत्र विमानात बसून प्रवास करत असतानाचा फोटो लोकसभेत दाखवला होता. नेमका तो फोटो कॉंग्रेसच्या हँडलवरून पुन्हा ट्विट करण्यात आला आहे.
राहुल गांधी यांना सुप्रीम कोर्टाने पुन्हा खासदारकी बहाल केल्याच्या घटनेनंतर इकडे महाराष्ट्रातही कॉंग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू असताना कॉंग्रेस आमदार वर्षा गायकवाड, भाई जगताप, कुणाल पाटील यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर येऊन जल्लोष साजरा केला. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड आणि शिवसेना आमदार आदित्य ठाकरे हेसुद्धा यावेळी कॉंग्रेस आमदारांच्या जल्लोषात सामील झाले होते.
राहुल गांधी हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अडचणीचे प्रश्न विचारतात. अनेकदा त्यांच्यावर तीखट हल्ला चढवतात, त्यामुळे राहुल गांधी यांच्यावर गुजरात राज्यात तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी भावना एका कॉंग्रेस कार्यकर्त्याने बोलून दाखवली. राहुल गांधी यांना गुजरात स्थानिक न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाकडून या प्रकरणात न्याय मिळू शकला नव्हता. परंतु सुप्रीम कोर्टाने राहुल गांधी यांना दिलासा दिला आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयान्वये राहुल गांधी पुन्हा संसदेत हजर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधातील टीकेची धार आणखी तीव्र होईल, असं राजकीय जाणकारांचं मत आहे.
संबंधित बातम्या