विधानसभा निकालाच्या ११ दिवसानंतर महायुतीने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा केला आहे. भाजपकडून देवेंद्र फडणवीसांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ घातली आहे. महायुतीचा उद्या ५ डिसेंबर रोजी आझाद मैदानावर शपथविधीचा सोहळा होणार आहे. या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदेंना मंत्रिमंडळात सामील होण्याची विनंती केली आहे. यामुळे शिंदे मंत्रिमंडळात सामील होणार की, नाही याचा सस्पेन्स कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.
राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केल्य़ानंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले, मी काल स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्य़ांना या सरकारमध्ये आमच्यासोबत राहायला हवं,अशी विनंती केली आहे. या विनंतीला ते सकारात्मक प्रतिसाद देतील, याची मला खात्री आहे," असा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
एकनाथ शिंदेंनी सरकारमध्ये राहावं, अशी शिवसेनेच्या आमदारांबरोबरच महायुतीच्या आमदारांची देखील हीच इच्छा आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, एकनाथ शिंदे आमच्या सरकारमध्ये असतील. राज्यपालांकडे सत्ता स्थापनेचा दावा केल्यानंतर महायुतीच्या वरिष्ठ नेत्यांनी पत्रकार परिषद पार पडली, त्यावेळी ते बोलत होते.
फडणवीस म्हणाले, मागील अडीच वर्षात एकनाथ शिंदे, अजित पवार आणि मी तिघांनी एकत्रितपणे निर्णय घेतले आहेत. आज देखील आम्हाला मुख्य़मंत्री, उपमुख्यमंत्री पद ही तांत्रिक बाब आहे. इतर आमच्या मित्र पक्षांना विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. एकनाथ शिंदे यांनी मला मुख्यमंत्री म्हणून शपथ द्यावी, असं पत्र दिलेलं आहे. अजित पवार आणि इतर पक्षांनीही पत्र दिलेलं आहे. मी सर्वांचं आभार मानतो. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, जनसुराज्य पक्ष, युवा स्वाभिमान, रासप आणि अपक्ष या महायुतीच्या वतीने आज आम्ही सह्यांचं पत्र देऊन राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा केला आहे.किती लोकांचा शपथविधी होणार, याची माहिती सर्वांना सायंकाळपर्यंत दिली जाईल,उद्या सायंकाळी साडेपाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा होईल, असं फडणवीस म्हणाले.
अजित पवार म्हणाले, मी दिल्लीला माझ्या कामासाठी गेलो होतो, कुणाला भेटायला गेलो नव्हतो. माझी पत्नी राज्यसभेवर असल्याने सरकारी बंगला मिळाला आहे. त्या कामासाठी गेलो होतो. वकिलांना भेटलो. त्यांना भेटायला गेलो होतो. एका जवळच्या नातेवाईकांचे लग्न होते. या तीन कामासाठी दिल्लीत गेलो होतो. त्य़ामुळे डोक्यातून काढून टाका की, मी अमित शहा यांना भेटायला गेलो होतो.
संबंधित बातम्या