शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारनं काम थांबवलं-after shaktipeeth highway now maharashtra government stop work of industrial and bhaktipeeth highway also ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारनं काम थांबवलं

शक्तीपीठनंतर आता भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक, शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारनं काम थांबवलं

Sep 11, 2024 04:15 PM IST

shaktipeeth highway : स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन थांबवले होते. आता सरकारने भक्तिपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे भूसंपादनाला ब्रेक लावला आहे.

भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक
भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्गालाही ब्रेक

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्र सरकारने राज्यात शक्तीपीठ (Shaktipeeth Mahamarg),भक्तिपीठ (Bhaktipeeth Mahamarg) आणि औद्योगिक महामार्गाचे काम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. तीनही महामार्गांच्या भूसंपादनाला सुरूवात झाली आहे. मात्र स्थानिक शेतकऱ्यांच्या विरोधानंतर सरकारने शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन थांबवले होते. आता सरकारने भक्तिपीठ आणि औद्योगिक महामार्गाचे भूसंपादनाला ब्रेक लावला आहे. शेतकऱ्यांच्या विरोधात जाऊन सरकार कोणताही महामार्ग लादणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केले होते, त्यानुसार आता सरकारने तिन्ही महामार्गांचे भूमिअधिगृहण थांबवलं आहे.

समृद्दी महामार्गानंतर शक्तीपीठ, भक्तीपीठ आणि औद्योगिक महामार्ग हा महायुती सरकारचा सर्वात महत्वकांक्षी प्रकल्प म्हणून ओळखला जात होता. समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर हे तीन महामार्ग उभारण्यात येणार होते. राज्याची दळणवळण व्यवस्था मजबूत व सुलभ करण्यासाठी हे प्रकल्प मोठी भूमिका बजावणार होते. मात्र आता या तिन्ही महामार्गाचं काम थांबवण्यात आलं आहे. नागपूर-गोवा असा शक्तिपीठ महामार्ग होणार होता. पुणे नाशिक औद्योगिक महामार्ग तर सिंदखेड राजा ते शेगाव असा भक्तीपीठ महामार्ग होणार होता. या तीन महामार्गांसाठी जवळपास सव्वालाख कोटी रूपयांची गुंतवणूक होणार होती.

महामार्गाच्या भूसंपादनाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केल्याने एमएसआरडीसीने भूसंपादन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. हे तीन महामार्ग सध्या वादाच्या भोवऱ्यात अडकल्याने सरकारला माघार घ्यावी लागली आहे. शक्तीपीठ महामार्गामध्ये राज्यातील २७ हजार हेक्टर जमिनी अधिग्रहित करण्याची योजना होती. मात्र याला सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांचा विरोध होता. यानंतर सरकारने एक पाऊल मागे घेण्याचा निर्णय घेतला.

‘औद्याोगिक महामार्गाने पुणे -नाशिक अंतर केवळ २ तासात पार केले जाणार होते. या महमार्गासाठी भूसंपादन देखील सुरू होते. तर दुसरीकडे समृद्धी महामार्गावरून तीर्थक्षेत्र शेगावला जलदगतीने जाता यावे यासाठी सिंदखेडराजा – शेगावदरम्यान समृद्धी महामार्गाचा विस्तार करून भक्तीपीठ मार्ग तयार करण्यात येणार होता. मात्र बुलढाण्यातील शेतकऱ्यांनी विरोध केल्याने ‘भक्तीपीठ महामार्ग’ रद्द करण्यात आला.

समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर राज्यात शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०२३ मध्ये केली होती. ८०२ किमी लांबीचा ग्रीनफिल्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडला जाणार होता. महाराष्ट्रातील १२ आणि गोव्यातील एका जिल्ह्यातून जाणारा हा मार्ग राज्यातील तीन शक्तीपीठांना जोडणार असल्याने या महामार्गाला ‘शक्तीपीठ’ महामार्ग असे नाव देण्यात आलं आहे.

Whats_app_banner
विभाग