BMC declares holiday tomorrow : भारतीय हवामान विभागानं दिलेल्या रेड अॅलर्टच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील सर्व शाळा व महाविद्यालयांना उद्या (गुरुवार, २६ सप्टेंबर) सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडा, असं आवाहन मुंबई महापालिकेनं मुंबईकरांना केलं आहे.
परतीच्या पावसानं बुधवारी सायंकाळपासून महाराष्ट्रातील काही भागांत अक्षरश: धुमाकूळ घातला. मुंबईतही पावसाचा जोर प्रचंड होता. विजांच्या लखलखाटासह पाऊस कोसळत होता. सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास मुंबईत पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस साडेनऊ वाजेपर्यंत न थांबता बरसत होता. त्यामुळं मुंबईतील अनेक भागांत पाणी तुंबलं. मध्य रेल्वेची लोकल सेवा पुरती विस्कळीत झाली. पावणे दहाच्या सुमारास पावसानं उसंत घेतली. भारतीय हवामान विभागानं उद्याही मुंबई व आसपासच्या जिल्ह्यांत अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
पावसाचा हाच जोर उद्याही कायम राहणार आहे. हवामान विभागानं उद्या, सकाळी साडेआठ वाजेपर्यंत मुंबईसाठी रेड अॅलर्ट जारी केला आहे. त्यानंतर शाळा व कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची खबरदारी म्हणून मुंबई महापालिकानं शहर व उपनगरातील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली आहे. नागरिकांनी स्वत:ची काळजी घ्यावी व आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदतीसाठी १९१६ या क्रमांकावर संपर्क साधावा, असं आवाहनही महापालिकेनं केलं आहे.