मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  येत्या काही वर्षात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल! उद्धव ठाकरेंचा टोला

येत्या काही वर्षात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल! उद्धव ठाकरेंचा टोला

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Feb 12, 2024 04:38 PM IST

Uddhav Thackeray : भाजपमध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, येत्या काही वर्षात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानं राज्यात पुन्हा राजकीय भूकंप होण्याची चिन्हे आहेत. अशोक चव्हाणांसोबत काँग्रेसचे १० ते १५ आमदार पक्ष सोडणार असल्याची चर्चा आहे. अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यानंतर उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे. भाजपमध्ये आत्मविश्वास नसल्याने ते फोडाफोडी करत आहेत, येत्या काही वर्षात भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली आहे.

छत्रपती संभाजीनगरमध्ये जनसंवाद मेळाव्याला संबोधित करताना अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याबाबत उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली. उद्धव ठाकरे म्हणाले अशोक चव्हाणांचं आश्चर्य वाटतं. कालपरवापर्यंत जागावाटपामध्ये हिरीरीने सहभाग घेत होते. मग आज असं अचानक काय घडलं की, अशोक चव्हाण तिकडे जात आहेत,असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला.

निवडणूक आयोगाने या आधी शिवसेना चोराच्या हातात दिली,राष्ट्रवादी काँग्रेसही चोराच्या हातात दिली. आता काँग्रेससुद्धा अशोकरावांच्या हातात देतात की काय हे पाहावे लागेल. कारणदेशात काहीही होऊ शकतो.विशेष म्हणजे रोज जे काही दंड थोपटता आहेत. बेटकुळ्या तर काय येतच नाहीयेत, बेटकुळ्यासुद्धा भाड्याने घ्याव्या लागत आहेत’,अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

पंतप्रधानांनी संसदेमध्ये जे भाषण केलं. अबकी बार एवढे पार,अबकी पार तेवढे पार,मग जर एवढे पार असतील तर मग ही फोडाफोडी का करत आहात. तुमच्यामध्ये आत्मविश्वास नाही. तुम्ही४०० पार काय ४० हीपार करू शकणार नाहीत. म्हणून बिहारमध्ये नितीश कुमारांना घ्या, इकडं अशोक चव्हाणांना घेतलं जातंय. अजित पवारांना घेतलं. शिंदेंना घेतलं. भाजपने दहा वर्षे जर प्रामाणिकपणे काम केलं असतं, तर ही वेळ आली नसती. सगळी भाडोत्री लोकं घेतली जात आहेत. बाजारबुणगे घेतले जात आहेत आणि ते भाजपमधले निष्ठावंत आज सतरंज्या उचलत आहेत त्यांच्या बोडक्यावर बसवले जात आहे’, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.

 

‘काही वर्षांपूर्वी काँग्रेसमुक्त भारत असा भाजपचा नारा होता.  मात्र आता आता एवढे सगळे काँग्रेसवाले घेताहेत की, आता काँग्रेसव्याप्त भाजप अशी त्यांची परिस्थिती झाली आहे. आणखी काही वर्षांनी असंही होईल की, भाजपचा अध्यक्षही काँग्रेसमधून आलेला असेल’,असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.

WhatsApp channel