EVM Machine Stolen From Saswad In Pune : पुण्यातील सासवड येथील तहसील कार्यालयातून तीन चोरट्यांनी ईव्हीएम मशीन चोरल्याने खळबळ उडाली होती. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली असून तहसीलदार, उपविभागीय अधिकारी आणि डीवायएसपी यांना निलंबित करण्याचे आदेश मुख्य सचिवांनी दिले आहेत. तसेच या प्रकरणी १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
सासवड येथील तहसील कार्यालयाच्या स्ट्रॉंगरूम मधून तीन चोरट्यांनी ईव्हीएम मशीन लंपास केली होती. यावेळी सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे हे ड्यूटीवर होते. सोमवारी सर्व जण कामावर आले असता, त्यांना स्ट्रॉंग रूमचा दरवाजा उघडा दिसला. दरम्यान, ईव्हीएम चोरल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. तहसीलदार विक्रम राजपूत यांनी देखील पाहणी करून ईव्हीएम चोरीबाबत प्रांताधिकारी वर्षा लांडगे यांना कळविले. पोलिसांनी घटनास्थळी येत पंचनामा केला. मतदान करण्याच्या डेमो (प्रात्यक्षिक) मशिनसह काही कागदपत्रांची चोरी झाल्याचे उघड झाले.
पोलिसांनी याची गंभीर दखल घेत सहायक फौजदार डी. एल. माने आणि होमगार्ड जवान राहुल जरांडे यांना मंगळवारी निलंबित केले होते. मात्र, या घटनेची दाखल थेट केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतली. त्यांनी या प्रकरणी पुरंदर प्रांताधिकारी- वर्षा लांडगे -खत्री, तहसीलदार विक्रम राजपूत, उपविभागीय पोलिस अधिकारी तानाजी बर्डे यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहे. तसेच पोलिस आधीक्षकांनी १२ फेब्रुवारी दुपारी ३ पर्यंत अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे.
सासवडमधील तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून मतदान यंत्रे (कंट्रोल युनिट) चोरून पसार झालेल्या चोरट्यांना ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. भैय्या उर्फ शिवाजी रामदास बंडगर (वय २१), अजिंक्य राजू साळुंखे (वय २१, दोघे रा. माळशिरस, ता. पुरंदर, जि. पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. सासवड येथील तहसीलदार कार्यालयात मतदान यंत्रे (ईव्हीएम, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट) ठेवण्यात आली आहेत. चोरट्यांनी तहसीलदार कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. खोलीतील लोखंडी मांडणीवर मतदान यंत्रे ठेवण्यात आली होती. चोरट्यांनी एक मतदान यंत्र (डेमो) चोरून नेल्याचे मंगळवारी उघडकीस आले. तहसील कार्यालयातून मतदान यंत्र चोरीला गेल्यानंतर सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.