शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी उर्फ मनोहर भिडे यांनी केलेल्या महात्मा गांधीबाबतच्या वक्तव्यानंतर राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे. संभाजी भिडे यांच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस व राष्ट्रवादीकडून ठिकठिकाणी आंदोलने केली जात आहेत. महात्मा गांधींचे वडील हे करमचंद गांधी नसून एक मुस्लीम जमीनदार आहेत. त्यांचं पालनपोषणही मुस्लीम जमीनदारानेच केलं, असे वादग्रस्त विधान भिडे यांनी केले होते.
संभाजी भिडे यांच्या या विधानावरून राज्याभर तीव्र प्रतिक्रिया उमटत असताना या पडसाद राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही उमटले. भिडेंना अटक करण्याच्या मागणीसाठी विरोधकांनी आक्रमक पवित्रा घेतला. राज्य सरकारने संभाजी भिडेंची सुरक्षा व्यवस्था काढून घ्यावी अशी मागणी विरोधकांनी केली. पण संभाजी भिडे यांना कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था पुरवलीच नसल्याचे, गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सभागृहात सांगितलं. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार जितेंद्र आव्हाड यांनी थेट पुरावाच सादर केला. संभाजी भिडेंना पुरवलेल्या सुरक्षा व्यवस्थेचा व्हिडिओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विटरवरून शेअर केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संभाजी भिडेंना पुरवलेल्या सुरक्षेबद्दल विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. मनोहर कुलकर्णीला पोलिसांचं संरक्षण आहे. त्यांना संरक्षण असेल तर ते संरक्षण काढून घेणार का? महापुरुषांचा अवमान करून स्वत: संरक्षणात राहायचं, हे योग्य नाही, आपण त्यावर काय निर्णय घेणार? असा सवाल जयंत पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारला.
यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संभाजी भिडेंना अशी कोणतीही सुरक्षा पुरवलेली नाही. जयंत पाटलांची माहिती चुकीची आहे. फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतर आता जितेंद्र आव्हाडांनी ट्वीट करत थेट पुरावाच सादर केला आहे.
या ट्विटमध्ये जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे की, सरकार म्हणतंय, मनोहर भिडेला सुरक्षा नाही. खालील व्हिडीओ बघा. हे पुरावे आहेत. गेल्या आठवड्यामध्ये संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेसह मनोहर भिडे अकोला व अमरावती येथे फिरत होते. सरकार किती खोटं बोलणार? असा सवालही आव्हाडांनी केला आहे.