Sunetra Pawar Rajya Sabha poll : अवघ्या देशाचे लक्ष लागून असलेल्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा दारुण पराभव झाला. दरम्यान, पक्ष सुनेत्रा पवार यांना आगामी राज्यसभा निवडणुकीत उमेदवारी देण्याची शक्यता आहे. अजित पवार यांच्या पत्नी बारामतीतून लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या. बारामती लोकसभा निवडणुकीचा मुद्दा हा प्रतिष्ठेचा बनवण्यात आला होता. पराभव झाला असतांना देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांना कठोर शब्दात उत्तर देताना सुनेत्रा पवार यांना पुन्हा एकदा खासदार बनवण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यसभेसाठी उमेदवार म्हणून अजित पवार यांनी घोषणा केली आहे. आज सुनेत्रा पवार या अर्ज दाखल करणार आहेत. २६ जून रोजी होणाऱ्या राज्यसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महायुतीकडे जवळपास १८० आमदार असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस कुणाला उमेदवारी जाहीर करणार या कडे लक्ष लागले होते. दरम्यान, छगन भुजबळ, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांची नावे देखील चर्चेत होती. मात्र, अजित पवार यांनी राज्यसभेसाठी सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा केली आहे.
राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी दोन वर्षांच्या कार्यकाळात राजीनामा दिल्यामुळे ही जागा रिक्त झाली होती. सुनेत्रा पवार निवडून आल्यास त्यांना चार वर्षांचा खासदारकीचा कार्यकाळ मिळेल. दरम्यान, या बाबत चौथ्यांनदा खासदार झालेल्या सुप्रिया सुळे म्हणाल्या हा एनसीपीचा अंतर्गत प्रश्न आहे. उमेदवारी कुणाला द्यायची हा राष्ट्रवादीचा अंतर्गत विषय आहे. त्यांनी राज्यसभेसाठी रिंगणात उतरावे, असे सुळे म्हणाल्या.
सुनेत्रा पवार राज्यसभेत खासदार झाल्या तर बारामतीच्या विकासावर संघर्ष होण्याची शक्यता आहे का, असे विचारले असता सुळे म्हणाल्या, “एखादी व्यक्ती खासदार झाली तर ते त्यांच्या मतदारसंघाच्या विकासाचा मुद्दा मांडू शकतात असे सुळे म्हणाल्या.
विजयानंतर सुनेत्रा पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले का, यावर सुळे यांनी नाही असे उत्तर दिले. सुळे म्हणाल्या, असे असले तरी मी त्यांना मोबाइल वर मेसेज पाठवला आहे.
राज्यसभेच्या रिक्त जागेसाठी एनसीपी कडून आणखी काही नावे ही चर्चेत आहेत. मात्र, असे असले तरी अजित पवार यांनी पक्षाच्या नेत्यांना सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यासाठी पटवले असल्याची माहिती आहे.
सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देणार का ? असे विचारले असता राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याने विविध नावांवर विचार सुरू असल्याचे सांगितले. "आज रात्रीपर्यंत नाव निश्चित होईल आणि उद्या ते घोषित केले जाईल," ते म्हणाले.
बारामती लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा विजय निश्चित करण्यासाठी अजित पवारांनी स्वतःची प्रतिष्ठा पणाला लावली होती. या साठी त्यांनी बारामती करांना भावनिक डावपेचांना बळी पडू नका, असे आवाहन करत शरद पवार यांच्यावर टीका केली होती. बारामतीच्या खासदार म्हणून अजित पवार यांनी सुळे यांच्यावर देखील टीका केली होती. "गेल्या १५ वर्षांत बारामतीच्या खासदाराने काय केले? संसदरत्न मिळाल्याने निधी मिळण्यास मदत होत नाही, असे अजित पवार सुळे यांच्यावर टीका करतांना म्हणाले होते.
तर अजित पवार यांच्यावर पुतणे रोहित पवार यांनी मते विकत घेण्यासाठी पैसे वाटल्याचा आरोप केला होता. मात्र, हे आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावले होते. त्यांनी रोहितला आरोप करण्याची सवय आहे असा टोला लगावला होता.
दरम्यान, महाविकास आघाडीकडे आवश्यक संख्याबळ नसल्याने पोटनिवडणुकीसाठी उमेदवार उभे करण्याची शक्यता नाही. "जर सहा उमेदवार असतील, तर २८८ च्या घरात प्रत्येकाला किमान ४४ मतांची गरज आहे. जर दोन उमेदवार असतील, तर जास्तीत जास्त मते मिळवणारा विजयी होईल. महायुतीकडे १८० आमदार आहेत. त्यामुळे निवडणूक होईल असे वाटत नाही. ती बिनविरोध होईल, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी सांगितले.
शिवसेना (यूबीटी) गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनीही सांगितले की, महाविकास आघाडीकडे संख्याबळ नाही आणि त्यामुळे ते उमेदवार उभे करण्याची शक्यता नाही. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनीही उमेदवार उभे करण्याची शक्यता फेटाळून लावली.
सुनेत्रा पवार जर राज्यसभेवर आल्या तर हा त्यांचा पहिला राजकीय विजय असेल. सुनेत्रा पवार यांनी आता पर्यन्त एक देखील निवडणूक लढवलेली नाही.