राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना डेंग्यूची लागण झाली आहे. जयंत पाटील यांनी ट्विट करत डेंग्यू झाल्याची माहिती देत रिपोर्ट पोस्ट केला आहे. त्यामुळे भर दिवाळीत जयंत पाटील डेंग्यूग्रस्त झाले आहेत. दुसरीकडे, दसऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार मराठा आरक्षणाचा राज्यात वनवा पेटला असताना डेंग्यूग्रस्त झाल्याने त्यांना विश्रांती घ्यावी लागली होती.
जयंत पाटलांनी ‘एक्स’ अकाउंटवर ब्रीच कँडी रूग्णालयाचा तपासणी अहवाल शेअर केला आहे. त्यावर लिहिलं की, “कालपासून मला ताप आलेला असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्याने मी आज डेंग्यूची तपासणी केली. थोड्या वेळापूर्वीच त्याचे रिपोर्ट आले असून मला डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले आहे. काही दिवस विश्रांती घेऊन मी शक्य तितक्या लवकर माझ्या दैनंदिन व पक्ष कामकाजाला सुरूवात करेन.”
दरम्यान,अजित पवारांना डेंग्यूची लागण झाल्याची माहिती खासदार प्रफुल्ल पटेल यांनी दसऱ्याच्या दरम्यान म्हणजे २९ ऑक्टोबरला दिली होती. यानंतर ८ नोव्हेंबरला आजारामुळे अशक्तपणा, थकवा जाणवत असला तरी प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे, असं अजित पवारांनी ‘एक्स’ अकाउंटवरून सांगितलं होतं. पण, १० नोव्हेंबरला अजित पवार दिल्लीत गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानं राजकीय चर्चा रंगल्या होत्या.
दरम्यान आज दिवाळी पाड्व्यानिमित्त शरद पवारांचे निवासस्थान गोविंद बागेत सर्व पवार कुटूंबीय एकत्र आले असताना अजित पवारांची अनुपस्थिती नजरेत भरत होती. त्यावर कोणाचे तरी आजारपण असते, वैयक्तिक कामे असतात अशी प्रतिक्रिया शरद पवारांनी दिली होती. मात्र रात्रीच्या वेळी अजित पवार सहकुटूंब शरद पवारांच्या घरी दाखल झाल्याचे सांगितले जात आहे. तसेच सर्वांनी एकत्रित स्नेहभोजन केल्याचेही बोलले जात आहे.
संबंधित बातम्या