Amit Shah on Uddhav Thackeray And Sharad Pawar : भाजपने आज विधानसभा निवडणुकीनिमित्त जाहीरनामा प्रसिद्ध केला आहे. संकल्पपत्र असे या जाहीरनाम्याचे नाव देण्यात आले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन करण्यात आले आहे. या संकल्पपत्रात तब्बल २५ वचनं भाजपनं दिली आहे. यावेळी सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार याचे संकेत गृहमंत्री अमित शहा यांनी दिले आहेत. उद्धव ठाकरे किंवा शरद पवार यांना सोबत घेणार का ? या पत्रकारांच्या प्रश्नाला देखील शहा यांनी उत्तर दिलं आहे.
या संकल्पपत्राच्या अनावरणावेळी भाजपाचे नेते व गृहमंत्री अमित शाह, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री सुधीर मुनगंटीवार उपस्थित होते. शिवसेनेत एकनाथ शिंदे तर राष्ट्रवादीत अजित पवार यांनी बंडखोरी करत भाजपसोबत महायुतीत सहभागी झले होते. दरम्यान, भाजपच्या जाहिरनाम्याच्या प्रकाशन सोहळ्यात पत्रकारांनी अमित शहा यांना पुढचा मुख्यमंत्री कोण होणार या बाबत विचारणा केली. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री कोण होणार या बाबत भाष्य केलं. अमित शहा म्हणाले, मुख्यमंत्री पदाचा चेहरा हा निवडणुकीनंतर ठरवण्यात येईल. या बाबत तिन्ही पक्ष निर्णय घेतील. सध्या राज्यात महायुती सरकार असून याचं नेतृत्व हे एकनाथ शिंदे करत आहेत. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होणार हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन ठरवतील, असे शहा म्हणाले.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शहा म्हणाले, शरद पवार यांनी राज्यासाठी काय केले. तुम्ही केंद्रात दहा वर्ष मंत्री होता. तब्बल २००४ ते २०१४ पर्यंत महाराष्ट्राच्या विकासासाठी तुम्ही काय केले. जेव्हा राज्यात व केंद्रात दोन्हीकडे तुमची सत्ता असतांना राज्यासाठी काय केलं? आमची सत्ता असताना राज्याला आम्ही मोठा निधी दिला. याचे आकडे सर्वश्रुत आहेत. सिंचनात ३० टक्के वाढ करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले. मुंबई, पुणे, नागपुरात मेट्रो विस्तार केला. कोस्टल रोड पूर्ण झाला, अटल सेतू पूर्ण केला. तर वाढवण बंदराचा निर्माणासाठी भूमिपूजन देखील केले. शरद पवार जी आश्वासने देतात ती वास्तवाशी संबंधित नसतात. ते नकली जनादेश घेतात. मात्र, यावेळी आमच्या सोबत जनता आहे असे शहा म्हणाले.
गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरे तुम्ही रामजन्मभूमीचे नेते आहात. मात्र, तुम्ही विरोध करणाऱ्यांसोबत आज बसले आहात. तुम्ही सावरकरांना विरोध करणाऱ्यांसोबत असून ते सीएए-यूसीसीला देखील करतात. २०१९ मध्ये राज्यातील जनतेने आम्हाला कौल दिला होता. मात्र, काही लोकांनी आम्हाला धोका दिला. मात्र, सत्तेत ते फार काळ टिकू शकले नाहीत. मी उद्धव ठाकरे यांना विचारतो की, सावरकरांबद्दल राहुल गांधीना दोन शब्द चांगले बोलायला तुम्ही लावू शकाल का ? काँग्रेसच्या नेत्यांना बाळासाहेब ठाकरेंबद्दल दोन शब्द चांगले बोलायला लावाल का ? असे देखील शहा म्हणाले.