Mumbai Rape Threat: मुंबईत भररस्त्यात ४९ वर्षीय महिलेला बलात्काराची धमकी, वांद्रे येथील घटना; आरोपी अटकेत-after being called out for violating traffic rules man threatens woman with rape in bandra ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Rape Threat: मुंबईत भररस्त्यात ४९ वर्षीय महिलेला बलात्काराची धमकी, वांद्रे येथील घटना; आरोपी अटकेत

Mumbai Rape Threat: मुंबईत भररस्त्यात ४९ वर्षीय महिलेला बलात्काराची धमकी, वांद्रे येथील घटना; आरोपी अटकेत

Aug 26, 2024 05:03 PM IST

Man Threatens Woman With Rape in Mumbai: मुंबई येथील वांद्रे येथे भररस्त्यात महिलेला बलात्काराची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी खार येथील एका तरुणाला अटक केली आहे.

मुंबईत भररस्त्यात महिलेला बलात्काराची धमकी
मुंबईत भररस्त्यात महिलेला बलात्काराची धमकी

Mumbai Rape Threat News: महिला आणि अल्पवयीन मुलींवर होणाऱ्या अत्याचाराच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच बदलापूरमध्ये एका नामांकित शाळेत शिपायाने चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचा घटना घडली. या घटनेच्या निषेधार्थ राज्यभरात ठिकठिकाणी निदर्शने सुरू असताना मुंबईतील वांद्रे येथून धक्कादायक माहिती समोर आली. नो-एंट्री लेनमध्ये दुचाकी चालवताना रोखले म्हणून खार येथील एका तरुणाने ४९ वर्षीय महिलेला बलात्काराची धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या अशा कृत्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

सागर गुजर (वय, २५) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीने गेल्या शुक्रवारी वांद्रे येथील पाली हिल नाका येथे फिर्यादी महिलेला थेट बलात्काराची धमकी दिली. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी वाहतूक नियमांचे उल्लंघन करत असल्याने संबंधित महिलेने त्याला फटकारले. यानंतर आरोपीला राग अनावर झाला आणि त्याने महिलेच्या कारचा पाठलाग केला. महिलेने आपली कार थांबल्यानंतर आरोपीने तिला बलात्काराची धमकी दिली आणि घटनास्थळावरून पळ काढला. यानंतर महिलेने तातडीने इमर्जन्सी हेल्पलाइनवर फोन करून धमकीची माहिती दिली. आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. आरोपी हा एका मेडिकल दुकानात काम करत असल्याचे पोलिसांना माहिती मिळाली. अवघ्या २४ तासाच्या आत पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या. याबद्दल महिलेने पोलिसांचे आभार मानले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला कामावर जात असताना आरोपी तिच्या कारच्या समोर आला. महिलेने हॉर्न वाजवून कारच्या खिडकीतून खाली उतरून त्या व्यक्तीला सांगितले की, तो नो एन्ट्री रोडमध्ये शिरला आहे. यानंतर आरोपी संतापला आणि त्याने तिला भररस्त्यात शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. या महिलेने त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, त्यानंतर आरोपीने महिलेच्या कारचा पाठलाग केला आणि कार थांबल्यानंतर तिला बलात्काराची धमकी दिली. महिलेच्या तक्रारीवरून आरोपीनेविरुद्ध वांद्रे पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५१ (२) (गुन्हेगारी धमकी), ७९ (शब्दांचा वापर करून महिलेच्या शीलाचा अपमान करणे), १२५ (इतरांचा जीव धोक्यात घालणे) आणि २८१ (निष्काळजीपणे वाहन चालविणे) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

संबंधित महिलेने आपल्या ट्विटर हँडलवरून या घटनेची माहिती देत पोलिसांच्या कामगिरीचे कौतूक केले. तिने आपल्या पोस्टमध्ये लिहिले आहे की, 'वरिष्ठ निरीक्षक संजय मराठे, सहाय्यक निरीक्षक विजय आचरेकर, सहायक उपनिरीक्षक रमेश पेडणेकर आणि हवालदार राजू ताडगे, मच्छिंद्र सांगवे, राहुल चतुर आणि इतर पोलीस कर्मचाऱ्यांनी अवघ्या २४ तासांत आरोपीला पकडले, ज्याने मला बलात्काराची धमकी दिली. त्याबद्दल तुमचे मनापासून आभार!'

विभाग