Asim Sarode allegations : ‘शिवसेनेतून फुटून राज्याबाहेर पळालेले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) समर्थक आमदारांपैकी काहींनी गुवाहाटीच्या हॉटेलात (Guwahati Hotel) एअर होस्टेसवर अत्याचाराचा प्रयत्न केला होता,’ असा खळबळजनक दावा सामाजिक कार्यकर्ते अॅड. असीम सरोदे यांनी केला आहे. या प्रकाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
‘निर्भय बनो’ आंदोलनाच्या वतीनं आयोजित धाराशीव येथील जाहीर सभेत ते बोलत होते. 'निर्भय बनो' या बॅनरखाली काही सामाजिक कार्यकर्ते देशातील लोकशाही विरोधी घटनांवर व सरकारच्या निर्णयावर आवाज उठवत आहेत. त्यावेळी सध्याच्या राजकारणावर बोलताना सरोदे यांनी हा आरोप केला.
'एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना सोडलेले ४० आमदार सुरत मार्गे गुवाहाटीला गेले होते. महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं असल्यानं या आमदारांचा मुक्काम तिथंच होता. आमदारांचे नाचतानाचे व पिकनिक एन्जॉय करतानाचे फोटो, व्हिडिओ देखील त्यावेळी व्हायरल झाले होते. याच वेळी ही भयंकर घटना घडली होती, असा गौप्यस्फोट सरोदे यांनी केला.
‘गुवाहाटीतील ज्या हॉटेलात सगळे आमदार थांबले होते, तिथं इतर ग्राहकांना परवानगी नव्हती. मात्र, स्पाइसजेट आणि इंडिगो या दोन विमान कंपन्यांनी काही खोल्या आधीच वर्षभरासाठी बुक केल्या होत्या. त्यामुळं तिथं वरच्या मजल्यावर काही एअर होस्टेस राहात होत्या. त्यांचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला गेला. अत्याचाराचा प्रयत्न झाला. हे सगळं कुणी केलं हे महाराष्ट्रानं शोधलं पाहिजे. दारूच्या नशेत हे नेते झिंगत होते. हा पैशाचा खेळ आता महाराष्ट्रात चालू देऊ नका, असं आवाहन असीम सरोदे यांनी केलं.
‘गुवाहाटीच्या त्या हॉटेलमधून एक आमदार पळून गेला. जवळपास ८ किलोमीटर गेल्यानंतर त्यांना पकडण्यात आलं आणि पुन्हा आणलं. त्यांना हॉटेलमध्ये प्रचंड मारहाण करण्यात आली. त्यानंतर आणखी एका आमदाराला मारहाण करण्यात आली. त्या दोन आमदारांना कुणी मारहाण केली?,’ असा सवाल असीम सरोदेंनी यांनी केला.
असीम सरोदे यांचे हे सर्व आरोप शिंदे गटानं फेटाळून लावले आहेत. संपूर्ण सुरक्षा, पोलीस व्यवस्था असताना, ४० आमदार एकत्र असताना हे सगळं कसं घडलं? दीड वर्षांनंतर सरोदेंना जाग कशी आली? आमच्यावर आरोप केल्यामुळं वजन वाढतं हे या पोपटांना माहीत आहे. त्यांच्याकडं लक्ष देण्याची गरज नाही, असं शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले. उबाठा गटाला खूष करण्यासाठी हे आरोप केले जात आहेत. त्यांना आम्ही कवडीचीही किंमत देत नाही, असं शिरसाट म्हणाले.