RTE Admission : शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) गेल्या काही महिन्यांपासून प्रवेश प्रक्रिया रखडली होती. ही प्रवेश प्रक्रिया कधी सुरू होणार या कडे सर्वांचे लक्ष लागून होते. अखेर या प्रवेश प्रक्रियेला मुहूर्त मिळाला असून आरटीईअंतर्गत विद्यार्थी नोंदणी प्रक्रिया आज पासून सुरू होणार आहे. या साठी पालकांना १६ ते ३० एप्रिल या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहे.
वंचित, सामाजिक दुर्बल आणि मागास घटकातील विद्यार्थ्यांना चांगले शिक्षण मिळावे यासाठी शिक्षण हक्क कायद्या अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध शाळांमध्ये प्रवेश दिला जातो. मात्र, ही प्रक्रिया गेल्या काही दिवसांपासून रखडली होती. सध्या शालेय शिक्षण विभागाने आरटीई प्रवेश प्रक्रियेत यावर्षी पासून काही बदल केले आहेत. विद्यार्थ्याच्या राहण्याच्या ठिकाणापासून एक किलोमीटरपर्यंतच्या अंतरा दरम्यान, अनुदानित शाळा, शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांची शाळा नसेल तर एक किलोमीटरच्या अंतरावरील खाजगी शाळेत त्यांना प्रवेश दिला जाणार आहे. या शाळांची निवड करतांना शासकीय शाळा, अनुदानित शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा व शेवटी खासगी शाळा या प्राधान्यक्रमानुसार मुलांना प्रवेश मिळणार आहे.
आरटीई पोर्टलवर शाळांची नोंदणी झाल्यावर देखील आरटीई प्रवेश प्रक्रियेला दोन महिने उशिराने - सुरूवात झाली. यातील दीड महिना शाळांची नोंदणी करण्यात गेल्याने ही प्रक्रिया होणार की नाही असे प्रश्न पालकांकडून विचारले जात होते. अखेर ही प्रक्रिया आता सुरू झाली आहे.
शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) करण्यात आलेल्या बदलामुळे आता आरटीई प्रवेश प्रक्रियेत जागा देखील वाढल्या आहेत. यावर्षी राज्यातील ७५ हजार ९७४ शाळांमधील ९ लाख ७२ हजार ८२३ जागांवर मुलांना प्रवेश दिला जाणार आहे. या साठी ऑनलाइन पद्धतीने मुलांना अर्ज करता येणार आहे, अशी माहिती प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी यांनी दिली.
पुणे जिल्ह्यात आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी ७७ हजार ९२७ जागा उपलब्ध आहेत. या साठी तब्बल ५ हजार १५३ शाळांनी नोंदणी केली केली होती. पुण्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात या साठी अर्ज करण्यात येतो.
आरटीई अंतर्गत प्रवेशासाठी पालकांना ऑनलाइन नोंदणी करावी लागणार आहे. या साठी लागणारी नियमावली, कागदपत्रे आदींबाबबत माहिती ही आरटीई पोर्टलच्या संकेत स्थळावर देण्यात आली आहे. https://student.maharashtra.gov.in/adm_portal या संकेतस्थळावर पालकांनी जाऊन अधिक माहिती तपासावी असे आवाह करण्यात आले आहे.
संबंधित बातम्या