मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Kolhapur Violence : हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीचार्ज, इंटरनेट सेवा बंद

Kolhapur Violence : हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण, पोलिसांकडून लाठीचार्ज, इंटरनेट सेवा बंद

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Jun 07, 2023 05:08 PM IST

Internet Shutdown In Kolhapur : कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागलं असून त्यानंतर जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आहे.

Internet Shutdown After Violence In Kolhapur
Internet Shutdown After Violence In Kolhapur (PTI)

Internet Shutdown After Violence In Kolhapur : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी समाजकंटकांनी सोशल मीडियावर वादग्रस्त स्टेटस ठेवल्यानंतर कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहे. मंगळवारी संध्याकाळी यावरून शहारातील बिंदु चौकात दोन गट आमने-सामने आले होते. त्यानंतर पोलिसांनी मध्यस्थी करत वाद मिटवला. त्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांनी आज कोल्हापुरात बंदची हाक दिली आहे. जिल्हा प्रशासनाने संपूर्ण शहरात जमावबंदी लागू केली असून अनेक ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. परंतु आता कोल्हापुरात हिंदुत्ववादी संघटनांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्याची घटना समोर आली आहे.

कोल्हापुरात मुख्य चौकात दोन गटात दगडफेक आणि राडा झाल्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत जमाव पांगवला आहे. याशिवाय शहरातील प्रत्येक चौकात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विनाकारण बाहेर पडणाऱ्या लोकांवर पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. तसेच दोन्ही गटातील लोकांवर पोलिसांकडून अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत लाठीचार्ज करण्यात आल्याची माहिती आहे. त्यानंतर आता शहरातील संभावित स्थिती लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर शहर व परिसरातील इंटरनेट सेवा अनिश्चित काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. शहरातील नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडण्याचं आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार आणि पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केलं आहे.

कोल्हापुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकालगत असलेल्या गंजी गल्ली, महाद्वार रोड, अकबर मोहल्ला, महापालिकेचा भाग आणि शिवाजी रोड या ठिकाणी तोडफोडीच्या घटना घडल्या आहे. दोन गट सातत्याने आमने-सामने येत असल्यामुळं शहरात तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली आहे. त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज करत धुडगूस घालणाऱ्यांना हुसकावून लावलं असून परिस्थिती पुन्हा नियंत्रणात आणली आहे. त्यानंतर आता कोल्हापुरातील तणावस्थिती लक्षात घेता राज्याच्या गृह विभागाकडून सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहे.

IPL_Entry_Point