Aaditya Thackeray on Best Bus Service : मुंबईकरांच्या दैनंदिन जीवनावर थेट परिणाम करणाऱ्या बेस्ट सेवेला आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं आर्थिक सहाय्य करावं, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे युवा नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्तांकडं केली आहे. तसंच, आर्थिक अडचणींकडं बोट दाखवून भाडेवाढ करू नये, असंही आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.
आदित्य ठाकरे यांनी महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांनी सविस्तर पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी बेस्ट बस सेवा व कामगारांच्या सध्याच्या स्थितीकडं लक्ष वेधत काही मागण्या केल्या आहेत.
'लाखो मुंबईकरांना दररोज इच्छित स्थळी पोहोचवणारी जगातील सर्वात स्वस्त आणि आधुनिक आरामदायी बससेवा अशी 'बेस्ट'ची ओळख होती. तिच्या आधुनिकीकरणासाठी, इंधन बचतीसाठी आणि पर्यावरणाची हानी टाळण्यासाठी इलेक्ट्रिक बसेस आणण्याची संकल्पना राबवण्याचं काम माझ्या हातून होऊ शकलं याचा मुंबईकर म्हणून मला अभिमान आहे, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
'गेल्या दोन वर्षांच्या काळात मुंबईच्या ह्या बससेवेकडं प्रशासनाचं जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे असं जाणवलं. मुंबईची जीवनवाहिनी आणि मुंबईकरांचा अभिमान असलेली 'बेस्ट' बससेवा आर्थिक अडचणीत आहे. परंतु तिला पूर्वी मान्य केलेलं आर्थिक सहाय्य करायला मुंबई महानगरपालिकेनं नकार दिल्याचं समजलं. आर्थिक अडचणीत आलेली बससेवा कोलमडून पडण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम मुबईकराच्या जीवनमानावर होणार आहे. मुंबई महानगरपालिका MMRDA सारख्या संस्थेला आर्थिक मदत करू शकते, तर बेस्ट बस सेवेलाही आर्थिक सहाय्य मिळायला हवं. याबाबत आमच्या आपणासमोर काही आणि गांभीर्याने विचार केला जावा, असं आदित्य यांनी म्हटलं आहे.
> बेस्ट सेवेला मुंबई महानगरपालिकेनं आर्थिक सहाय्य करावं.
> बेस्टची आडेवाढ केली जाऊ नये.
> बेस्ट कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार आणि पेन्शन मिळत राहावी, तारीख चुकवली जाऊ नये.
> बसच्या संख्येतील नियोजित वाढ तातडीनं आमलात आणली जावी.
मुंबईकरांचा प्रतिनिधी म्हणून मी आपणासमोर या मागण्या ठेवत आहे. मुंबईकरांसाठी महत्वाच्या असलेल्या बेस्ट खच्चीकरण केलं जाऊ नये अशी आमची इच्छा आहे. बेस्ट बससेवा संपवून आपल्या कुठल्या खासगी कंत्राटदार मित्राच्या सेवेला चालना देण्याचा मिंधे राजवटीचा प्रयत्न नसेल तर आपण वरील सर्व मागण्या पूर्ण कराल आणि मुंबईकरांची बेस्ट संकटातून बाहेर काढाल, अशी अपेक्षा आदित्य यांनी शेवटी व्यक्त केली आहे.