Aaditya Thackeray : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा 'महादजी शिंदे राष्ट्र गौरव पुरस्कार' देऊन सत्कार करणाऱ्या शरद पवार यांच्यावर ठाकरेंच्या शिवसेनेनं टीकेची झोड उठवली आहे. उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यानंतर आता आदित्य ठाकरे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. ‘घाणेरडी कामं करणाऱ्याचा सन्मान आम्ही करू शकत नाही आणि ते आम्हाला मान्यही नाही,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
ते ‘एएनआय’ या वृत्तवाहिनीशी बोलत होते. ‘शरद पवार यांचं वय, ज्येष्ठता किंवा तत्त्वांवर मी भाष्य करणार नाही. मात्र, आमची तत्त्वं वेगळी आहेत. जो कोणी महाराष्ट्राच्या विरोधात काम करतो, जो कोणी महाराष्ट्राच्या हिताशी तडजोड करतो तो आमच्या दृष्टीनं महाराष्ट्र द्रोही आहे. आणि महाराष्ट्रासारख्या एखाद्या राज्याशी द्रोह म्हणजे ते देशाशी द्रोह असतो. त्यामुळं तो माणूस देशद्रोही सुद्धा ठरतो,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
'एकनाथ शिंदे यांनी केवळ आमचा पक्ष आणि कुटुंब फोडलं नाही तर महाराष्ट्राच्या कण्यावर घाव घातला आहे. राज्यातील उद्योगधंदे उद्ध्वस्त केले आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यांच्या कार्यकाळात वाढल्या. अनेक शेतकरी आंदोलनं झाली. महिलांवर अत्याचार झाले. तरुण बेरोजगार झाले आहेत. हा देशद्रोह आणि महाराष्ट्र द्रोह आहे. अशी सगळी घाणेरडी कामं करणाऱ्यांचा सन्मान आम्ही कधी करू शकत नाही, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
‘शरद पवार यांच्या तत्त्वांविषयी मला काही बोलायचं नाही. त्यांचं वय आणि ज्येष्ठता पाहता मी खूप ज्युनियर आहे,’ असं आदित्य ठाकरे म्हणाले.
९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्त शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना नुकतंच महादजी शिंदे राष्ट्रगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या पुरस्कार सोहळ्यात शिंदे आणि पवार दोघांनीही एकमेकांची स्तुती केली. त्यामुळं ठाकरेंची शिवसेना संतापली आहे. संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांच्या या भूमिकेवर थेट टीका केली आहे.
विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा पराभव झाल्यापासून शिवसेना (उबाठा), राष्ट्रवादी (शप) आणि काँग्रेस यांच्यात बिनसलं आहे. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत ठाकरे यांच्या शिवसेनेनं दिले आहेत. त्यात आता शरद पवार यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केल्यामुळं शिवसेनेला आणखी एक निमित्त मिळालं आहे. त्यामुळं महाविकास आघाडी अधिकृतपणे विसर्जित होण्याचीच शक्यता आहे.
संबंधित बातम्या