Aditya Thackeray on Election Commission : निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेत हरियाणा आणि जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकांची घोषणा केली. हरियाणा व महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत नोव्हेंबरमध्ये संपत असतानाही निवडणूक आयोगाने महाराष्ट्राची निवडणूक जाहीर केलेली नाही. हरियाणामध्ये एक टप्प्यात निवडणूक होणार असून १ ऑक्टोबर रोजी मतदान होईल तर जम्मू काश्मीरमध्ये ३ टप्प्यात निवडणूक होणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यप्रणालीवर जोरदार हल्ला चढवला आहे.
आदित्य ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले की,"एक राष्ट्र,एक निवडणूक" केवल चर्चेसाठी आहे. केद्रीय तडजोड आयोग (उर्फ निवडणूक आयोग) जम्मू आणि काश्मीरमध्ये एकाच टप्प्यात निवडणुकांसह महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचे कारण म्हणून "सुरक्षा दलांवर मर्यादा" असे नमूद करते.
जम्मू काश्मीरमध्ये जर परिस्थिती सुधारली नसले तर“भाजपच्या मजबूत नेतृत्वाखाली" तेथे काय बदलले आहे? दहशतवादी हल्ले वाढत आहेत, ही वस्तुस्थिती आहे.
महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचं त्यांनी दिलेलं आणखी एक कारण म्हणजे महाराष्ट्रातील “पाऊस” आणि त्यामुळे त्यांनी निवडणूक जाहीर करण्याची औपचारिकता पूर्ण केलेली नाही. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार फक्त महाराष्ट्रातच मान्सून आहे, देशातील इतर राज्यांमध्ये नाही.
एकेकाळी नावाजलेली ही देशातील स्वायत्त संस्था किती लाजिरवाणी व बटीक झाली आहे, यावरून समजते. मला वाटते त्यांच्या बॉसनी त्यांना महाराष्ट्रात निवडणुका घेण्यासाठी अजून परवानगी दिलेली नसेल.
राज्यातील बेकायदेशीर आणि असंवैधानिक राजवट सुरू ठेवण्याचा त्यांना नैतिक अधिकार नाही. भाजपकडे तर नैतिकता कधीच नव्हती. महाराष्ट्राने त्यांना लोकसभेला नाकारले आहे आणि पुन्हा नाकारणार आहेत.
महाराष्ट्रात निवडणुका न घेण्याचं कारण खरं कारण म्हणजे, त्यांच्या कंत्राटदारांना आमचे राज्य लुटण्याची मुभा देण्यासाठी निवडणूक आयोग सरकारला श्वास घेण्यास वेळ देत असल्याचं दिसते. चले जाव मिंधे सरकार!, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर केला आहे.
जम्मू काश्मिरमध्ये ११४ जागांसाठी तीन टप्प्यात मतदान होणार आहे. पहिला टप्पा १८ सप्टेंबरला, दुसरा टप्पा २५ सप्टेंबरला आणि तिसऱ्या टप्प्यात १ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. त्याचबरोबर हरियाणा राज्यात एकाट टप्प्यात १ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून दोन्ही राज्यांचा निकाल ४ ऑक्टोबरला लागणार आहे.