Aditya Thackeray advice to nitish kumar : दिल्लीत आज एनडीएतील घटक पक्षांची बैठक पार पडली. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड केली गेली. संसदीय दलाच्या नेतेपदी निवड झाल्याने ते तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. रविवारी एनडीए सरकारचा शपथविधी पार पडणार आहे. दरम्यान आदित्य ठाकरे यांनी केंद्रातील एनडीए सरकारच्या स्थापनेबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. आदित्य म्हणाले की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA )सरकार स्थापन करण्यात तेलगू देसम आणि जनता दल युनायटेड पक्षाची महत्त्वाची भूमिका आहे. मात्र या दोघांनीही लोकसभा अध्यक्षपद मिळवण्यावर ठाम राहावे.
आदित्य ठाकरे यांनी केंद्रात एनडीए सरकार स्थापन होत असल्याच्या पार्श्वभूमीवर एक्सवर पोस्ट करत दावा केला आहे की,नव्यानेच'एनडीए' ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना आहे.सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच.
आदित्य ठाकरे यांनीआपल्या सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष फोडल्याचाही उल्लेख केला.आदित्य ठाकरे म्हणाले भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगत आहे. तुमच्यासोबत सरकार बनवताच ते आश्वासने मोडतील आणि तुमचे पक्षही फोडण्याचा प्रयत्न करतील. याचा अनुभव तुम्ही आधीच घेतला असेल.
दरम्यान, स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी भाजपकडे पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे नरेंद्र मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान पद मिळवण्यासाठी टीडीपी आणि जेडीयूचा पाठिंबा महत्त्वाचा ठरला आहे .बहुमतासाठी २७२ खासदारांची आवश्यकता असताना भाजपला निवडणुकीत २४० जागा मिळाल्या आहेत. एनडीएकडे २९३ जागांचे स्पष्ट बहुमत आहे. टीडीपी १६ खासदारांसह एनडीएमधील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे आणि नितीश कुमारांचा जेडीयू १२ खासदारांसह एनडीएमधीलतिसऱ्या क्रमांकाचा पक्ष आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील एनडीए सरकार स्थापन करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. शुक्रवारी एनडीए संसदीय दलाच्या बैठकीत भाजप नेते प्रह्लाद जोशी यांनी सांगितले की, रविवारी (९ मे) नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतील. राष्ट्रपती भवनात सायंकाळी ६ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत हा शपथविधी कार्यक्रम असेल.
संबंधित बातम्या