Adani Foundation : भारतासह जगभरातील आणि महाराष्ट्रातील विविध पायाभूत सुविधा आणि इतर व्यवसायांमध्ये आपले अस्तित्व प्रस्थापित करणारा अदानी समूह आता शिक्षण क्षेत्रात देखील पुढे येणार आहे. अदानी फाऊंडेशनच्या माध्यमातून महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस येथील एका खासगी शाळेचा कारभार अदानी समूह हाती घेणार आहे.
राज्यातील सुमारे नऊ शाळांचे व्यवस्थापन हस्तांतरित करण्याचा शासन निर्णय (जीआर) शालेय शिक्षण विभागाने शुक्रवारी काढला. यात चंद्रपूर जिल्ह्यातील घुगूस येथील माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट शाळेचे व्यवस्थापन अहमदाबाद येथील अदानी फाऊंडेशनकडे सोपविण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला आहे. ही शाळा स्वयंअर्थसहाय्यित असून इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण देते. येत्या १५ दिवसांत शाळा व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे.
कार्मेल एज्युकेशन सोसायटीसंचलित माऊंट कार्मेल कॉन्व्हेंट हायस्कूलचे व्यवस्थापन अदानी फाऊंडेशनकडे देण्यात येण्याची चर्चा अनेक दिवसांपासून सुरू होती. अखेर या प्रस्तावाला अटी व शर्तींसह मंजुरी देण्यात आली आहे,' असे शासन जीआरमध्ये नमूद करण्यात आले आहे.
शासनाने घातलेल्या अटीनुसार अदानी फाऊंडेशन किमान विद्यार्थी संख्येच्या मर्यादेत बदल करू शकणार नाही. तसह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संपूर्ण जबाबदारी त्यांना अदानी फाउंडेशनला घ्यावी लागणार आहे. शाळेच्या मान्यतेच्या अटींमध्ये कोणताही बदल केला जाणार नाही असे देखील जीआरमध्ये नमूद करण्यात आलं आहे. अदानी फाऊंडेशनला शाळा, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि त्यांचे वेतन, विद्यार्थी आदींसंदर्भातील नियम-आदेशांचे पालन करावे लागेल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शाळा चालविणे आणि कर्मचाऱ्यांच्या सेवा शर्तींबाबतच्या अटींचे उल्लंघन केल्याच्या तक्रारी आल्यास व्यवस्थापनाची बदली रद्द करण्याचा अधिकार शासनाला राहणार आहे, असा इशारा शालेय शिक्षण विभागाने आपल्या आदेशात दिला आहे.
संबंधित बातम्या