Kondhawa Crime News Marathi : वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी पाठवलेला केक नाकारल्याच्या कारणावरून तरुणीला तिच्या घरात घुसून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल करत त्याच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. अंकित सिंग असं आरोपीचं नाव असून या घटनेमुळं कोंढव्यात संताप व्यक्त केला जात आहे. पीडित तरुणीने पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील कोंढवा परिसरात राहणाऱ्या एका तरुणीचा रविवारी वाढदिवस होता. त्यामुळं मांजरी परिसरातील एका ओळखीच्या तरुणाने पीडितेला ऑनलाईन ऑर्डर करत केक पाठवला. परंतु त्यासाठी तरुणीने नकार दिल्याने आरोपी संतापला. त्यानंतर आरोपी तरुणाने थेट मुलीच्या सोसायटीत धाव घेतली. सुरक्षारक्षकाला मारहाण करत आरोपीने तरुणीच्या घरात घुसून तिला मारहाण करायला सुरुवात केली. आरोपीच्या मारहाणीत तरुणीला गंभीर मार लागला असून तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यानंतर पीडित तरुणीने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.
वाढदिवसाला केक घेण्यास नकार दिल्याने आरोपी तरुणाने तरुणीला वेगवेगळ्या नंबरवरून फोन करत त्रास दिला होता. तसेच आरोपीने सोसायटीतील सुरक्षारक्षकाला मारहाण करत शिवीगाळ केली. त्यानंतर आता पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी आरोपीच्या अटकेची कार्यवाही सुरू केली आहे. काही दिवसांपूर्वी कोंढव्यात एका महिलेला मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. त्यानंतर आता वाढदिवसाला केक नाकारणाऱ्या तरुणीला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.