Pune Airport Threat : पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, आरोपी महिलेवर गुन्हा दाखल, तपास सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Airport Threat : पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, आरोपी महिलेवर गुन्हा दाखल, तपास सुरू

Pune Airport Threat : पुणे विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी, आरोपी महिलेवर गुन्हा दाखल, तपास सुरू

Published Aug 04, 2023 11:45 AM IST

Pune Airport Threat : आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणारा कॉल कंट्रोल रुमला आल्याने पुणे शहरात खळबळ उडाली आहे.

Pune Airport Bomb Threat
Pune Airport Bomb Threat (HT)

Pune Airport Bomb Threat : महाराष्ट्र एटीएसने पुण्यातून चार अतिरेक्यांना अटक केल्याची घटना ताजी असतानाच आता पुण्यातील आंतरराष्ट्रीय विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी देण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. त्यामुळं शहरात खळबळ उडाली असून पोलीस तसेच विमानतळावरील यंत्रणांना अलर्ट देण्यात आला आहे. नीता प्रकाश कृपलानी या दिल्लीतील महिलेने पुणे विमानतळ उडवून देण्याची धमकी दिली असून पुणे पोलिसांनी तिच्याविरोधात गुन्हा दाखल करत पुढील कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. संबंधित महिलेचं वय ७२ असून ती पुण्यातील विमानतळावर आल्याची माहिती आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी नीता प्रकाश कृपलानी ही महिला गुरुवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आली होती. त्यावेळी सुरक्षारक्षक महिलेची चौकशी करत असताना आरोपी महिलेने शरीराच्या चारही बाजूंनी बॉम्ब लावलेले असल्याचं सांगितलं. विमानतळावर आत जाण्यापूर्वी सुरू असलेल्या चौकशीला वेळ लागत असल्याने महिलेने सुरक्षारक्षकांना शरीराला बॉम्ब लावण्यात आल्याचं सांगितलं आहे. पुणे ते दिल्ली या फ्लाईटनं आरोपी महिला प्रवास करणार होती. पोलिसांनी या महिलेवर गुन्हा दाखल करत तिची उच्चस्तरीय चौकशी सुरू केली आहे.

पोलीस कर्मचारी दीपाली झावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी दिल्लीतील आरोपी महिलेवर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. परंतु महिलेनं बॉम्ब असल्याचा केलेला दावा हा केवळ अफवा असल्याचं पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. परंतु आरोपी महिलेने शरीरावर बॉम्ब असल्याचं सांगता विमानतळावरील प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली होती. विमानतळ पोलिसांनी आरोपी महिलेला नोटीस जारी केली असून योग्य उत्तर न दिल्यास कठोर कारवाई केली जाणार असल्याचं सांगितलं आहे. याशिवाय बॉम्बच्या धमकीनंतर पुणे विमानतळाची सुरक्षा वाढवण्यात आल्याची माहिती आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर