पुणे : आईच्या उपचारासाठी पैसे कमी पडत असल्याने तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी हिंजवडी ताथवडे परिसरातील एका व्यावसायिकांच्या मुलाचे अपहरण करण्यात आल्याची घटना पुण्यात उघडकीस आली आहे. पुणे, पिंपरी आणि सासवड पोलिसांनी अवघ्या तीन तासांत या मुलाची सुखरूप सुटका करत त्याला त्याच्या आईवडिलांकडे सुपूर्त केले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
तेजस ज्ञानोबा लोखंडे (वय २१, रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी, पुणे) अर्जुन सुरेश राठोड (वय १९, रा. दत्त मंदीर शेजारी, मारुंजी पुणे) विलास संजय म्हस्के (वय २२, रा. शिवारवस्ती, भुमकरचौक, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतून शस्त्राचा धाक दाखवून खंडणीसाठी एका व्यावसाईकाच्या १४ वर्षीय बालकाचे अपहरण करण्यात आले होते. आरोपी हे निळ्या रंगाच्या मारुती झेन गाडीतून आले होते. आरोपींनी मुलाच्या घरी फोन करून ३० लाख रुपयांची खंडणी मागितली. मुलांच्या वडिलांनी या प्रकरणी थेट हिंजवडी पोलिस ठाण्यात धाव घेत याची माहिती दिली. दरम्यान, पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तातडीने सूत्र हलवली. आरोपीने ज्या मोबाईलवरून फोन केला होता त्याचे पोलिसांनी लोकेशन तपासले. आरोपी हे सासवड परिसरात असल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तातडीने सासवड पोलिसांना याची माहिती दिली. सासवड पोलिसांनी देखील तातडीने तयार करत सासवड मार्गावर आरोपींच्या शोधासाठी तैनात केले.
सासवड येथील जुना कोडीत नाका ते सोपानकाका मंदिर रोडवर पोलिसांना सिध्दिविनायक अॅटो गॅरेज समोर एक गडद निळ्या रंगाची मारुती झेन कार संशयितरित्या येताना दिसली. सासवड पोलिसांनी गाडी अडवून गाडीतील व्यक्तींना खाली उतरवून गाडीची झाडाझडती घेतली. दरम्यान, घाबरलेल्या अवस्थेत एक लहान मुलगा गाडीत त्यांना दिसला. अहपहरण झालेला हाच मुलगा असल्याची खात्री पटल्यावर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेत मुलाची सुटका केली.
पोलिसांनी आरोपींकडून १ पिस्तुर, एक कोयता, सत्तूर, कटावणी, एक लोखंडी हातोडी आणि तीन मोबाईल जप्त केले. दरम्यान, अपहृत बालक आणि आरोपींना सासवड पोलिसांत आणण्यात आले. त्यातील एका आरोपींची आई आजारी असल्याने दवाखान्यात पैशांची गरज होती. तसेच त्याला व्यवसाय सुरू करायचा होता, म्हणून घरासमोरून एका व्यावसाईकांच्या मुलाचे अपहरण केल्याची कबुली आरोपींनी दिली आहे. त्यांनी अहरण केलेल्या मुलाच्या वडिलांना फोन करत तीस लाख रुपये घेऊन आम्ही सांगेल त्या ठिकाणी ये, असे म्हणत खंडणी मागितली होती. मात्र, केवळ तीन तासांत पोलिसांनी आरोपीला अटक केली.