
Dadar Mumbai Crime News Marathi : मुंबईत विवाहितेवर अत्याचार करण्यात आल्याची घटना ताजी असतानाच आता दादरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपी सावकाराने कर्जदाराच्या पत्नीवर सातत्याने दोन वर्ष बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बलात्कारावेळी आरोपीने पीडित महिलेचा व्हिडिओ शूट करत तिला ब्लॅकमेल करत वारंवार अत्याचार केला आहे. त्यानंतर आता या प्रकरणात मुंबई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपीला अटक केली आहे. फिर्यादी महिलेने दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. त्यामुळं आता या धक्कादायक घटनेने मुंबईतील दादर परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, डिसेंबर २०२१ मध्ये फिर्यादी महिलेच्या पतीने दादरमधील सावकार गिरीश वरळीकर याच्याकडून तीन रुपये टक्क्यांनी पाच लाख रुपयांचं कर्ज घेतलं होतं. त्यानंतर आरोपी सावकाराने पीडित तरुणाच्या पत्नीला फोन करत १२ लाख रुपयांच्या कर्जाचं आमिष देत भेटण्यासाठी बोलावलं. त्यानंतर आरोपीने व्यावसायिकाला भेटण्यासाठी वांद्रे येथे जात असल्याचं सांगत महिलेला खार परिसरातील एका हॉटेलमध्ये नेत तिच्यावर बलात्कार केला. तसेच महिलेचे अश्लील व्हिडिओही शूट केले. त्यानंतर व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत आरोपीने अनेकदा बलात्कार केल्याचं पीडित महिलेने तक्रारीत म्हटलं आहे. तसेच आरोपी वरळीकरने व्याजासह कर्जाच्या रकमेचा तगादा लावत शारिरीक आणि मानसिक छळ केल्याचंही पीडित महिलेने पोलिसांना सांगितलं आहे.
आरोपी सावकार गिरीश वरळीकर हा ब्लॅकमेल करत सातत्याने बलात्कार करत असल्याचं पीडित महिलेने पतीला सांगितलं. त्यानंतर दाम्पत्याने घडलेला सारा प्रकार पोलिसांना सांगितला आहे. त्यानंतर दाम्पत्याने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी गिरीश वरळीकर याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला तातडीने अटक केली आहे. आरोपी वरळीकर याच्याकडे लैंगिक अत्याचाराचा व्हिडिओ आहे की नाही, याची पोलिसांकडून चौकशी केली जात आहे. आरोपीवर बलात्कार आणि ब्लॅकमेलच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.
संबंधित बातम्या
