Shirdi Crime News Marathi : साईनगरी असलेल्या शिर्डीतून धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर येत आहे. कौटुंबिक वादातून जावयाने एकाच कुटुंबातील तीन लोकांची हत्या केली आहे. राहाता तालुक्यातील सावळी विहीर या गावात ही घटना घडली असून त्यानंतर आता पोलिसांनी आरोपीला नाशिक जिल्ह्यातून अटक केली आहे. सुरेश निकम असं आरोपीचं नाव असून वर्षा सुरेश निकम, रोहित गायकवाड आणि हिराबाई गायकवाड अशी मृतांची नावं आहे. कौटुंबिक वादातून जावयाने गायकवाड कुटुंबातील तिघांची निर्घृण हत्या केल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सुरेश निकम याचं नगर जिल्ह्यातील सावळी विहीर या गावातल्या वर्षा गायकवाड यांच्याशी लग्न झालं होतं. परंतु बायको सासरी येत नसल्याने निकम आणि गायकवाड कुटुंबियांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वाद होत होते. त्यामुळं संतापलेल्या आरोपी सुरेश निकमने थेट सावळीविहीर गावात येवून पत्नी वर्षा निकम, मेहूणा रोहित गायकवाड आणि सासू हिराबाई गायकवाड यांची धारदार शस्त्राने वार करून हत्या केली आहे. याशिवाय आरोपीने सासरे आणि त्यांच्या नातेवाईकांवरही जीवघेणा हल्ला केला आहे. जखमींना शिर्डीतील साईबाबा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.
आरोपीच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांची प्रकृती चिंताजनक असून रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. हत्याकांडाची माहिती समजताच शिर्डी पोलिसांनी तातडीने सावळीविहीर गावात धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. आरोपी सुरेश निकमला नाशिक जिल्ह्यातून अटक करण्यात आली असून त्याच्यावर हत्येच्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाच ते दहा मिनिटांतच आरोपीने तीन जणांची हत्या करत घटनास्थळावरून पळ काढला आहे. त्यानंतर या प्रकरणातील आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी सावळीविहिर गावातील नागरिकांकडून करण्यात आली आहे.