
Shrikant Pangarkar enters in Shiv sena : पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येचा आरोपी श्रीकांत पांगारकर याने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. गौरी लंकेश यांची ५ सप्टेंबर २०१७ रोजी रात्री बंगळुरूमध्ये त्यांच्या राहत्या घरासमोर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. कर्नाटक पोलिसांनी महाराष्ट्रातील यंत्रणांच्या मदतीने या संपूर्ण प्रकरणाचा तपास केला होता आणि या प्रकरणात अनेकांना अटक केली होती. पांगारकर हा २००१ ते २००६ या काळात जालना नगरपालिकेचा नगरसेवक होता. ऑगस्ट २०१८मध्ये त्याला अटक करण्यात आली होती. कर्नाटक उच्च न्यायालयाने ४ सप्टेंबर रोजी त्याला जामीन मंजूर केला होता.
आधी अविभाजित शिवसेनेने तिकीट नाकारल्याने पांगारकर याने २०११ मध्ये उजव्या विचारसरणीच्या हिंदु जनजागृती समितीत प्रवेश केला होता. मात्र, आता माजी राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्या उपस्थितीत त्याने शुक्रवारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश केला. ‘श्रीकांत पांगारकर माजी शिवसैनिक असून, ते पुन्हा पक्षात आले आहेत,’ असे माजी मंत्री खोत म्हणाले. जालना विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे प्रमुख म्हणून श्रीकांत पांगारकरची निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्रात नुकतीच विधानसभा निवडणूक जाहीर करण्यात आली. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत सर्व २८८ जागांसाठी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. २० नोव्हेंबरला मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला निकाल जाहीर होणार आहे. विद्यमान विधानसभेची मुदत २६ नोव्हेंबर रोजी संपत आहे.
गौरी लंकेश हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी श्रीकांत पांगारकर जामीन मिळाल्यानंतर नुकताच त्याच्या गावी पोहोचला होता, त्यावेळी काही कार्यकर्त्यांनी त्याचे जंगी स्वागत केले. गौरी लंकेश हत्या प्रकरणात न्यायालयाने परशुराम वाघमारे, मनोहर यादव आणि इतर सहा जणांना ९ ऑक्टोबर रोजी जामीन मंजूर केला होता आणि ११ ऑक्टोबर रोजी त्यांची तुरुंगातून सुटका झाली होती. हे सर्व जण ६ वर्षांहून अधिक काळ तुरुंगात होते. सगळेजण आपल्या गावी पोहोचले, तेव्हा हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी त्यांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ नेले, तेथे भगवी शाल आणि हार घालून त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी 'भारत माता की जय' आणि 'सनातन धर्म की जय'च्या घोषणा देण्यात आल्या.
संबंधित बातम्या
