Nagpur Crime News Marathi : लग्न झालेलं असताना विवाहबाह्य संबंध ठेवणं नागपुरातील महिलेला चांगलंच महागात पडलं आहे. अनैतिक संबंधामुळं संतापलेल्या नवऱ्याने आपल्याच बायकोचा गळा चिरून निर्घृण खून केला आहे. रविवारी दुपारी ११ वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. ललीत डहाट असं आरोपीचं नाव असून पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करत त्याला अटक केली आहे. प्रणाली दहाट असं पतीच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. मृत महिला ही वर्धा जिल्ह्यातील रहिवासी आहे. दिवसाढवळ्या झालेल्या हत्येच्या घटनेने नागपुरात खळबळ उडाली असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रणाली दहाट या तरुणीचं काही वर्षांपूर्वी चंद्रपुरात हॉटेलमध्ये बाऊन्सरचं काम करणाऱ्या ललीत डहाट या तरुणाशी लग्न झालं होतं. लग्नानंतर एक मुलगा व मुलगी झाल्यानंतर प्रणाली आणि ललीत यांच्यात सातत्याने वाद होत होते. त्यानंतर ललीत आणि प्रणाली यांनी चंद्रपूर सोडत नागपुरात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. त्यावेळी कापडाच्या दुकानात काम करत असलेल्या प्रणालीची एका बस ड्रायव्हरशी ओळख झाली. त्यानंतर पहिल्याच भेटीत झालेल्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. त्यानंतर प्रणाली अनेकदा न सांगता घरातून बाहेर पडत असल्याचं ललीतच्या लक्षात आलं. त्यावेळी त्याने बायकोला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
पतीने सतत सांगूनही त्याकडे दुर्लक्ष करत प्रियकराला भेटण्यासाठी जाणाऱ्या प्रणालीचा ललीतसोबत वाद झाला. पतीने सांगूनही अनैतिक संबंध तोडण्यास नकार दिल्यानंतर आरोपी ललीतने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली आहे. बायकोचा खून केल्यानंतर आरोपी ललीतने पोलिसांना फोन करून गुन्ह्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आरोपीला बेड्या ठोकल्या आहे. तसेच प्रणालीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.