Pune Ghorpadi crime : म्हणतात ना शहण्याने नवरा बायकोच्या भांडणात पडू नये. अशीची एक घटना पुण्यातील घोरपडी येथे उघडकीस आली असून नवरा बायकोतील भांडण सोडवणे पोलिस शिपायाच्या अंगलट आले आहे. भांडणाऱ्या नवरोबाने थेट पोलिस शिपायाच्या पायाला चावा घेत ट्याला गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी एकाविरुद्ध मुंढवा पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन प्रकाश काकडे (रा. आगवाली चाळ, घोरपडी) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव असून या प्रकरणी पोलीस शिपाई किरण बनसोडे यांनी मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बनसोडे हे मुंढवा पोलीस ठाण्यात नियुक्तीस आहेत. पती-पत्नीत वाद सुरू असल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला मिळाली. त्यानंतर बनसोडे यांनी घटनास्थळी पोहचण्याची सूचना नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांनी दिली.
बनसोडे घोरपडीतील आगवाली चाळ परिसरात पोहोचले. तेव्हा काकडेने बनसोडे यांना शिवीगाळ केली. तुला कोणी बोलावले, असे म्हणत काकडे हुज्जतबाजी घालायला लागला. एवढेच नि तर काकडेने बनसोडे यांना धक्काबुक्की देखील केली. बनसोडे यांनी त्याला बाजूला ढकलले. यावेळी काकडेने बनसोडे यांच्या पायाला चावा घेत त्यांना गंभीर जखमी केले. यामुळे सरकारी कामात अडथळा आणणे, तसेच धक्काबुक्की केल्याप्रकरणी काकडेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.