Sana Khan Murder Case : नागपूर भाजपच्या पदाधिकारी सना खान यांचा मध्यप्रदेशातील जबलपूर येथे निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पती अमित साहू यानेच सना यांची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. पैशाच्या आणि दागिन्यांच्या कारणावरून सना आणि अमित यांच्यात वाद झाला, त्यानंतर संतापलेल्या अमितने सनाच्या डोक्यात लोखंडी रॉडने वार खून केला. त्यानंतर मृतदेह नदीत फेकून दिला. त्यानंतर सना खान यांच्या कुटुंबियांच्या तक्रारीवरून नागपूर पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला आहे. तसेच आरोपी अमित साहू याला पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.
भाजपच्या पदाधिकारी सना खान या काही कारणास्तव नागपुरहून पती अमित साहू यांच्याकडे गेल्या होत्या. त्यावेळी जबलपुरला जात असल्याची माहिती त्यांनी कुटुंबियांना दिली होती. तिथं पोहचल्यानंतर सना यांचं आईशी बोलणंही झालं. परंतु जबलपुरला पोहचताच राजूल टाऊनमध्ये अमित साहू आणि सना खान यांच्यात जोरदार भांडण झाले. त्यानंतर अमित आणि ढाब्यावरील कर्मचाऱ्यांची मदत घेत सना खानचा मृतदेह हिरन नदीत फेकून दिला. त्याचवेळी नदीला पूर आल्याने घटनेचा भांडाफोड होणार नाही, असंही अमितला वाटलं. परंतु नागपूर पोलिसांनी थेट जबलपूर गाठत घटनेचं गूढ उकललं आहे.
सना खान जबलपुरला गेल्यानंतर संपर्क होत नसल्याने खान कुटुंबियांनी फोनाफोनी करायला सुरुवात केली. परंतु तरीदेखील संपर्क होत नव्हता. अखेर सनाच्या भावाने आरोपी अमित साहुला फोन करत सनाशी बोलण्याचा हट्ट धरला. त्यावेळी 'आमच्यात भांडणं झाली असून सना माझ्या घरून निघून गेली, ती कुठे गेली मला माहिती नाही', असं उत्तर अमित साहुने दिलं. त्यानंतर सना खानच्या कुटुंबियांनी नागपूर पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने जबलपूर गाठत प्रकरणाचा तपास सुरू केला. पोलिसांनी आरोपी अमित साहुला अटक केल्यानंतर त्याने सना खानची हत्या केल्याची कबुली दिली असून मृतदेह नदीत फेकल्याचंही पोलिसांना सांगितलं आहे.