मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  AC Local in Mumbai: एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये डोंबिवलीकर सर्वाधिक

AC Local in Mumbai: एसी लोकलने प्रवास करणाऱ्यांमध्ये डोंबिवलीकर सर्वाधिक

HT Marathi Desk HT Marathi
Aug 08, 2022 10:14 PM IST

गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलची सर्वाधिक तिकीटे ही डोंबिवली स्टेशनवरून विकली गेली आहे.

Air Condition local train in Mumbai
Air Condition local train in Mumbai (HT_PRINT)

मुंबई शहरातला लोकल रेल्वेचा प्रवास म्हटला की घामाघूम झालेल्या लाखो मुंबईकरांनी खच्चून भरून सतत धावणारे लोकलचे डबे… गर्दीमुळे लोकलच्या डब्याबाहेर लटकणारे मुंबईकर प्रवासी… असे चित्र डोळ्यासमोर येते. परंतु हे चित्र आता हळूहळू पालटू लागले आहे. मुंबईतील लाखो लोकल प्रवासी गेल्या अनेक वर्षांपासून एसी लोकलच्या प्रतीक्षेत होते. सहा महिन्यांपूर्वी मध्य रेल्वेने मुंबई शहर आणि उपनगरात एसी लोकलची सुरूवात केली. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलने प्रवास करणारे मुंबईकर तसेच उपनगरातील प्रवासी संख्येत मोठी वाढ झाली आहे. गेल्या सहा महिन्यांत एसी लोकलची सर्वाधिक तिकीटे ही डोंबिवली स्टेशनवरून विकण्यात आल्याचे ताज्या आकडेवारीवरून दिसून आले आहे. सहा महिन्यांच्या काळात डोंबिवली स्टेशनवरून एसी लोकलची एकूण ९४,९३२ तिकिटे विकल्या गेली आहे.

फेब्रुवारी २०२२ मध्ये एसी लोकल सुरू झाली तेव्हा दररोज फक्त ५,९३९ प्रवासी एसी लोकलने प्रवास करत होते. परंतु जुलै २०२२ मध्ये तब्बल ३४,८०८ प्रवासी एसी लोकलने प्रवास करत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. म्हणजे सहा महिन्यांच्या कालावधीत एसी लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांच्या संख्येत तब्बल सहा पटीने वाढ झाली आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात इतर वातानुकूलित वाहतूक व्यवस्था उपलब्ध आहे. परंतु वाहतुकीच्या इतर साधनांच्या तुलनेत एसी उपनगरीय लोकल जलद असल्याने मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी एसी ट्रेन हा उत्तम पर्याय ठरताना दिसतोय. हा प्रवास गारेगार तर असतोच शिवाय किफायतशीरही ठरत असल्याचे दिसून आले आहे. एसी लोकलला दिवसेंदिवस मिळत असलेल्या प्रतिसादामागे हे एक कारण असल्याचे मानले जातय.

५ मे २०२२ पासून सिंगल ट्रॅव्हल तिकिटचे दर ५० % कमी केल्यानंतर अधिकाधिक मुंबईकर एसी लोकलकडे वळत असल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. 

फेब्रुवारी २०२२ ते जुलै २०२२ या कालावधीतील तिकीट विक्रीच्या (सिंगल आणि सीझन तिकीट दोन्ही) बाबतीत मध्य रेल्वेवरील लोकलची पाच स्थानके टॉप ठरली आहेत. त्यातील सर्वाधिक म्हणजे ९४,९३२ एसी तिकीटांची विक्री ही डोंबिवली स्टेशनवरून झाली आहे. त्या पाठोपाठ ठाणे स्टेशन - ८४,३०९ तिकिटे, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस- ७०,४४४ तिकिटे, कल्याण स्टेशन - ७७,४१२ तिकिटे आणि घाटकोपर स्टेशनवरून ५३,५१२ तिकिटांची विक्री झाली आहे. ही आकडेवारी पाहता मुंबईकर प्रवाशांसाठी एसी लोकल एक आरामदायी प्रवासाचा पर्याय ठरताना दिसतोय.

WhatsApp channel

संबंधित बातम्या