Abu Salem petition rejected : १९९३ च्या मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील दोषी गँगस्टर अबू सालेमची तळोजा कारागृहातून इतरत्र हलवण्यात येऊ नये ही याचिका विशेष न्यायालयानं मंगळवारी फेटाळून लावली. सालेमने दुसऱ्या तुरुंगात त्याच्या जीवाला धोका असल्याचे कारण देत आपल्याला तळोजा कारागृहातून हलवण्यात येऊ नये, अशी मागणी करत कोर्टात याचिका दाखल केली होती. मात्र, न्यायालयाने मंगळवारी यावर निर्णय देत अबू सालेम याला दिलासा देण्यास नकार दिला.
कारागृहातील टोळी संघर्षावरून जीवाची भीती असल्याने अबू सालेमने मुंबई सत्र न्यायालयात याचिका दाखल केली होती. सालेमला नवी मुंबईतील तळोजा कारागृहातून दुसऱ्या कारागृहात हलवण्यात येऊ नये अशी मागणी त्याने याचिकेत केली होती. अबू सालेमची ही याचिका फेटाळण्यात आली आहे. कैद्यांचे एका तुरुंगातून दुसऱ्या तुरुंगात स्थलांतर करणे, ही सामान्य बाब आहे असा दावा तुरुंग प्रशासनाने न्यायालयात केला होता. न्यायालयाने तुरुंग प्रशासनाचा युक्तिवाद मान्य करत अबू सालेमची मागणी फेटाळून लावली.
तसेच सालेमला दुसऱ्या तुरुंगात हलवताना त्याच्या सुरक्षेची खबरदारी पोलिस योग्य पद्धतीने घेतील असे आदेश देखील कोर्टाने दिले. आरोपी अबू सालेमची सुरक्षा आणि सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी मध्यवर्ती कारागृह अधीक्षक तळोजा जेल अधीक्षकांना योग्य निर्देश जारी करतील. अबू सालेमला नाशिक मध्यवर्ती कारागृहात हलवण्यात येणार आहे.
राज्य कारागृह आधीक्षकांनी सालेमला नाशिक कारागृहात हलवण्याआधी सुरक्षेचा वेळोवेळी आढावा घ्यावा आणि चार महिन्यांतून एकदा त्याचा पुनरावलोकन अहवाल सादर करावा, असेही न्यायाधीशांनी सांगितले. यात तळोजा कारागृह आणि नाशिकरोड कारागृहात सुरक्षे संदर्भात त्रुटि आढळल्यास कठोर कारवाई केली जाईल, असेही न्यायाधीश म्हणाले.
सालेमच्या वकिलाने मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल करण्यासाठी वेळ मागितल्यानंतर, न्यायाधीशांनी सांगितले की ३ जुलैपर्यंत या आदेशाची अंमलबजावणी केली जाणार नाही.
अबू सालेमचे १९ वर्षांपूर्वी पोर्तुगालमधून प्रत्यार्पण झाल्यापासून सालेम तुरुंगात आहे. त्याची तळोजा तुरुंगातून नाशिक येथे रवानगी केली जात असतांना त्याच्या जिवाला धोका असून या बाबत कट कट रचला जात असल्याचे न्यायालयात सांगात या पूर्वी झालेल्या दोन हल्ल्यांचाही हवाला त्याने दिला.
संबंधित बातम्या